मराठी शाळांसाठी हल्लाबोल !

July 25, 2012 4:25 PM0 commentsViews: 5

25 जुलै

खासगी मराठी शाळांना परवानगी मिळावी या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचं स्वरूप राज्यव्यापी झालं. याची दखल घेत सरकारने आता आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र नुसती चर्चा नाही तर सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

खासगी मराठी शाळांना वाचवण्याचं आंदोलन आता थेट विधानसभेजवळ धडकलंय. राज्यातल्या शंभराच्या वर खासगी मराठी शाळांना मान्यता द्या.. आणि नव्या शाळांना मंजुरी द्या.. अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दिला.

खासगी मराठी शाळांना परवानगी मिळावी यासाठी गेली तीन वर्ष आंदोलनं सुरू आहेत. या वर्षी पुण्यात गेल्या 9 दिवसांपासून निदर्शनं सुरू आहेत. यावेळी आर या पारची लढाई आहे असं मानत पुण्याच्या शिक्षण संचलनालयासमोर शिक्षण हक्क समितीने आंदोलन पुकारलंय. विद्यार्थांसोबत पालकही आंदोलनाला बसलेत. नाशिकमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पुकारण्यात आलं. आनंद निकेतन आणि गुरुकुल या शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झालेत.

मराठी शाळांना मान्यता न देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी औरंगाबादमध्ये विदयार्थ्यासह शिक्षकानी दिवसभर एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन केले. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील खाजगी शाळांतील विदयार्थी आणि शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

सरकारतर्फे आता आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये शिक्षण मंत्री आंदोलकांशी चर्चा करतील असं आश्वासन देण्यात आलंय. मात्र जोपर्यंत सरकारकडुन लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय आंदोलनकांनी घेतलाय.

close