बाबा रामदेवांचा हल्लाबोल

August 13, 2012 4:57 PM0 commentsViews: 4

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली

13 ऑगस्ट

योगगुरु बाबा रामदेव आज त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार होते. त्याप्रमाणे आज रामलीला मैदानावर सकाळपासूनच गर्दी होती. विविध पक्षाचे नेते त्यांच्या व्यासपीठावर येऊन जोरदार भाषणबाजी करत होते. त्यानंतर बाबा रामदेव यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सकाळी थोड्याच वेळात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतो, असं सांगत रामदेव बाबांनी सगळ्यांची उत्सुकता ताणून धरली होती. त्यानंतर आंदोलनाच्या व्यासपीठावरुन बाबांनी नेहमीप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली. काळ्यापैशाच्या विरोधात चालू असलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन बाबा रामदेव यांनी केलं. त्यानंतर तिथं भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, जेडीयूचे नेते शरद यादव हेही दाखल झाले. शिवाय इतर पक्षाचे नेतेही होते. त्यांच्यासमोर बाबांनी काँग्रेसवर आगपाखड केली.आंदोलनाच्या व्यासपीठावरची भाषणं संपल्यानंतर बाबांनी त्यांच्या समर्थकांसह आपला मोर्चा वळवला तो संसदेच्या दिशेनं….त्यांचा मोर्चा मध्य दिल्लीतल्या रणजित सिंग उड्डाणपुलावर हा मोर्चा आला, तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवलं. तिथंच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आता बाबा रामदेव यांना आता दिल्लीबाहेर नेऊन सोडलं जाणार आहे. आयबीएन नेटवर्कशी बोलताना बाबांनी त्यांचे 2014 चे निवडणुकीचे मनसुबे स्पष्ट केले. बाबा रामदेव यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण गेल्या तीन दिवसांपासून बाबा रामदेव यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नव्हती. पण आज मोर्चा काढून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देऊन अखेर रामदेव बाबांनी सरकारला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला लावली. ही एक त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक म्हणावी लागेल.

बाबा रामदेवांची 2014 च्या निवडणुकीची रिहर्सल

बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा काळ्या पैशासंदर्भातलं आंदोलन सुरु केलं. त्याचवेळी त्यामागची त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होत होती. याच राजकीय कौशल्याच्या जोरावर बाबांनी सर्वच काँग्रेसविरोधी पक्षांना त्यांच्या व्यासपीठावर आणण्याचं कसब दाखवलं. एवढंच नाही, तर विरोधकांना 2014 च्या निवडणुकांची जणू इथं रिहर्सलच केली.

रामदेव बाबांनी अखेर स्पष्ट राजकीय भूमिका घेतली. निव्वळ उपोषण करुन किंवा धरणं देऊन आंदोलन फारकाळ चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतंच. त्यामुळंच सरकार विरोधातून त्यांचं आंदोलन स्पष्टपणे काँग्रेसविरोधी झालं.

ह्या जाहीर घोषणेनंतर रामदेव बाबांना बिगर काँग्रेस पक्षांकडून पाठिंबा मिळणं साहजिक होतं. देशातली प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या एनडीएच्या वजनदार नेत्यांनी मग रामदेवांना पाठिंबा जाहीर केला.

बिजू जनता दल आणि अण्णा द्रमुक ह्या दोन्ही पक्षांनी रामदेवांना पाठिंबा दिलाय. तर मायावती आणि मुलायम ह्या उत्तरेतल्या प्रमुख नेत्यांनी आंदोलनाच्या मुद्याला समर्थन दिलंय. पण, असा हा तमाम बिगर काँग्रेस वर्ग एकत्र आलेला बघताच काँग्रेसनेही बाबा रामदेव यांच्यावर टीका केली. रामदेव यांचा खरा चेहरा समोर आल्याचं काँग्रेस म्हणाली.

एकंदरीत बाबा आणि आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं देशातल्या तमाम बिगर काँग्रेसी वर्गाला एकत्र येण्याची आणखी एक संधी दिली. आगामी लोकसभा निवडणूक ही त्यामुळेच चुरशीची होईल यात आता शंका नाही.

close