अंतुलेवर कारवाईचे संकेत

December 18, 2008 5:02 AM0 commentsViews: 2

18 डिसेंबर, दिल्लीहेमंत करकरे यांच्या मृत्यूवर शंका घेणार्‍या केंद्रीय मंत्री ए. आर अंतुले यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. हेमंत करकरेंचा मृत्यू नक्की दहशतवादी हल्ल्यातच झाला का ? याविषयी बुधवारी अंतुले यांनी शंका घेतली होती. मात्र यासंदर्भात कोणतेही पुरावे ते देऊ शकले नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती."करकरे हे अतिशय बहादूर अधिकारी होते. देशहितापुढे त्यांना आपल्या प्रणांचीही पर्वा नव्हती. पण ताज किंवा ओबेरॉयमध्ये जाण्याऐवजी ते वेगळीकडेच कशाला गेले ?" असा सवाल अंतुले यांनी विचारला होता. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी प्रचंड टीका केली होती. काँग्रेसनेही हे अंतुलेंचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं होतं.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी हेमंत करकरे मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करत होते.त्यामुळे अनेक हिंदू संघटनांनी त्यांना टीकेचं लक्ष केलं होतं. मात्र प्रचंड राजकीय दबावातही त्यांनी आपला तपास सुरूच ठेवला होता. त्यामुळे अंतुले यांचा रोख मुस्लिमेतर दहशतवादाकडे असल्याचं बोललं जात होतं अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी शहीदांच्या मृत्यूचं अंतुले राजकारण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे आपली प्रतिमा टिकवण्यासाठी काँग्रेस अंतुलेंवर कारवाई करेल, असं बोललं जात आहे.

close