राजकारणामुळे विकास मंदावला – पंतप्रधान

August 15, 2012 4:47 PM0 commentsViews: 35

15 ऑगस्ट

आज देशाचा 66वा स्वातंत्र दिन… दिल्लीतल्या लालकिल्यावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. पण त्यातून फारसं आशादायी चित्र दिसलं नाही. महागाई चटके येणार्‍या काळातही सहन करावे लागतील आणि आघाडी सरकारमुळे केंद्राचे हात बांधले असल्याचंच त्यांनी पुन्हा एकदा सूचित केलं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचीही त्यांनी आपल्या भाषणात दखल घेतली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा देशाची आर्थिक परिस्थिती आणि राजकीय संकट याचीच उजळणी केली. त्यांच्या भाषणात निराशेचाच सूर असला तरी त्यांनी जवळपास सर्वच विषयांना हात घातला. महगाई, लोकपाल विधेयक, लष्करी अधिकार्‍यांना पेंशन आणि आसाममधल्या हिंसाचाराचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. पण या सर्व मुद्द्यांवर काही ठोस उपाय त्यांनी सांगितले नाही. पंतप्रधानांचं भाषण प्रेरणादायी नसल्याची टीका विरोधकांनी केली. पंतप्रधानांनी अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाविषयीही भाष्य केलं नाही. महागाई, पावसानं मारलेली दडी आणि एकामागून एक उघड होत असलेले घोटाळे, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं भाषण फार आश्वासक ठरलं नाही. मंगळ मोहिमेला कॅबिनेटनं दिलेली मंजुरी हीच काय ती चांगली घोषणा.

close