नाशिकमध्ये ‘मनसे’च्या सत्तेला 6 महिने पूर्ण,प्रश्न जैसे थेच !

August 16, 2012 11:26 AM0 commentsViews: 6

दीप्ती राऊत, नाशिक

16 ऑगस्ट

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येऊन 6 महिने झाले आहेत. या दरम्यान आपण वेळ देऊ शकलो नसल्याची कबुली अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. अर्थात 3 आमदार आणि 1 महापौर आणि 40 नगरसेवक असतानाही मनसेची विशेष कामगिरी नाशिकमध्ये दिसत नाही.

नाशिकच्या रस्त्यांवर धावणारा गाड्यांचा ताफा. सोबत अधिकार्‍यांची आणि पदाधिकार्‍यांची जंत्री. एका बाजुला आयुक्त तर दुसर्‍या बाजुला महापौर. राज ठाकरेंच्या पहाणी दौर्‍याचं हे दृश्य नाशिककरांना नवीन नाही. शिवसेनेत असताना सेनेचे महापौर असायचे आता मनसेचे होते एवढाच काय तो फरक.

गोदापार्क… राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट. तब्बल 10 वर्षांनी राज ठाकरे गोदापार्कची पहाणी करताहेत. शहर विकासाबद्दलच्या त्यांच्या कल्पना अत्यंत रम्य असल्या तरी अंमलबजावणी अभावी त्या कवी कल्पनाच ठरताहेत.

महापालिकेत मनसेची सत्ता येऊन 6 महिने झाले. नाशिककरांनी मनसेला 3 आमदार दिले, 40 नगरसेवक दिले आणि पहिले महापौरही…मात्र, जकातीचं खाजगीकरण रद्द करण्याच्या धोरणात्मक निर्णयाशिवाय मनसे नाशिकमध्ये विशेष कामगिरी दाखवू शकलेली नाहीए. पण पक्षाध्यक्ष राज ठाकरे म्हणतात, आपण 5 वर्षांचा विचार करावा. 6 महिन्यात काय झालं ते बघू नका. या सार्‍याकडे माझं बारकाईनं लक्ष असतं, त्यानुसार तुम्हाला रिझलटस् दिसतील.'

अर्थात त्यासाठी आता नाशिककरांनी 5 वर्षे वाट बघावी असं गाजर राज ठाकरेंनी पुढे केलंय. अर्थात बरं झालं, राज ठाकरेंच्या दौर्‍यातच शहराच्या बकाल उद्यानांची वाताहत पुढे आली. शहराचं भूषण असलेल्या कुसुमाग्रजांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाची ही दुर्दशा. विशेष म्हणजे, मनसेचे नगरसवेक आणि मनसेचे आमदार दोघेही याच मतदार संघातले आहेत.

close