माफी मागण्यास अंतुलेंचा नकार

December 18, 2008 9:24 AM0 commentsViews: 6

18 डिसेंबर, दिल्लीअल्पसंख्यांक मंत्री ए. आर. अंतुले यांनी बुधवारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या विधानावर माफी मागण्यास नकार दिला आहे. बुधवारी संसदेत हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी त्यांनी शंका उपस्त्‌ति केली होती. त्यानंतर आज सकाळी झालेल्या कॉंग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी अंतुलेंच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. लोकसभेतही विरोधकांनी अंतुलेंवर कारवाईची मागणी केली. चहूबाजूंनी वाढलेल्या या दबावामुळे अंतुलेंनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली होती. नंतर त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणालाही पत्र लिहण्याची, स्पष्टीकरण देण्याची किंवा माफी मागण्याची गरज नाही. आपण पंतप्रधान किंवा सोनिया गांधी यांना कोणतही पत्र लिहिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान, करकरेंच्या मृत्यूविषयी केंद्र सरकारच्या वतीने औपचारिक विधान आज प्रणव मुखर्जी करणार आहेत. हेमंत करकरेंचा मृत्यू नक्की दहशतवादी हल्ल्यातच झाला का ? याविषयी बुधवारी अंतुले यांनी शंका घेतली होती. मात्र यासंदर्भात कोणतेही पुरावे ते देऊ शकले नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अंतुले यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गोंधळामुळे नागपुरात विधान सभेचं कामकाजही काही काळ स्थगित करावं लागलं होतं. मात्र हे अंतुले यांचं वैयक्तिक मत असल्याचं काँग्रेसनही स्पष्ट केल्याने अंतुले एकाकी पडले होते.कधी नव्हे दहशतवादाच्या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी आपापसातले वाद विसरून एकत्र आल्याचं चित्र दिसत होतं. पण अंतुले यांच्या या वक्तव्यामुळे या एकीवर पाणी फिरवलं गेलं. अंतुले यांच्या या विधानामुळे काँग्रेस हायकमांडही त्यांच्यावर नाराज होती. गुरुवारी सकाळी झालेल्या मीटिंगमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अंतुलेंवर टीका केली होती. सोनिया गांधीही अंतुलेंवर नाराज असून त्या दुपारी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंतुलेंवर कारवाई होणार असल्याचे संकेतही काँग्रेसमधल्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहेत.

close