राज-उध्दवचे सुरात सूर, नव्या समिकरणांची नांदी ?

September 3, 2012 4:46 PM0 commentsViews: 7

विनोद तळेकर, मुंबई

03 सप्टेंबर

काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या मुद्यांवर एकमेकांवर हल्लाबोल करणारे ठाकरे बंधू आता वेगवेगळ्या मुद्यांवर एकमेकांच्या सुरात सूर मिसळत आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आजारपणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ आले. त्यानंतर त्यांच्या भूमिकांमध्ये हा बदल जाणवतोय. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

रझा अकादमीच्या मोर्चानंतर राज ठाकरे भलतेच आक्रमक झालेत. पोलीस आणि मीडियावर झालेल्या हिंसक हल्ल्याचा निषेध म्हणून मनसेनं काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळी राज यांनी केलेल्या भाषणाचीही जबरदस्त चर्चा झाली. यावेळी शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. पण दुसर्‍या दिवशी उद्धव ठाकरेंनी या मोर्चाचे कौतुक करून अनेकांना धक्का दिला. सामनातूनही मनसेला पहिल्या पानावर जागा मिळाली. या घटनेला एक आठवडाही पूर्ण होत नाही.. तो राज ठाकरेंनी बिहारींवर हल्लाबोल केला.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राजवर टीका केल्यावर लगेच शिवसेना मनसेच्या मदतीला धावून आली. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला शिवाजी पार्कला हेरिटेज देण्याच्या मुद्द्यावरही शिवसेनाच्या भूमिकेला मनसेने पाठिंबा दिला. आधी मुंबई पोलिसांचा मुद्दा..मग शिवाजी पार्कचा मुद्दा.. आणि आता बिहारींना विरोध करण्याचा मुद्दा…दोन्ही सेना एकत्र आलेल्या दिसत आहे. आता केवळ मुद्द्यांवर एक झाले असले.. तरी यातच भविष्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची बिजं असू शकतात.

close