ह. मो.मराठेंनी व्यक्त केली दिलगिरी

September 10, 2012 5:13 PM0 commentsViews: 17

10 सप्टेंबर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी मतदारांना पत्र पाठवले. मला छत्रपती शिवरायांचा नितांत आदर आहे. ते सर्वांचे दैवत आहे. पत्रकामध्ये अनवधानानं जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. सदर उल्लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जेम्स लेनचा केलेला उल्लेख मागे घेतो अशी दिलगिरी ह.मो.मराठे यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली. साहित्य संमेलनाच्या प्रचारातल्या पत्रकात जेम्स लेनच्या उल्लेख केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या या पत्रकामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ह. मो. मराठे जर याच भूमिकेचा आधार घेऊन अध्यक्ष झाले तर संमेलन उधळून लावू, असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला होता.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच वादात सापडते. यंदासुद्धा ही निवडणूक अध्यक्षपदाचे उमेदवार ह मो मराठे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वादात सापडली होती. ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या कार्याबद्दल साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अपप्रचार केला जाईल, अशी शंका व्यक्त करत मराठेंनी आपली भूमिका एका पत्राद्वारे मतदारांसमोर मांडली होती. त्यावर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला. मराठेंना अशा पद्धतीचा प्रचार करु देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला. मराठेंनी पत्राद्वारे घेतलेल्या भूमिकेबद्दल साहित्य परिषदेने मात्र हात झटकले होते. आणि ही निवडणूक साहित्य महामंडळ घेत असल्याचं म्हटलंय. साहित्याच्या व्यासपीठावर वैचारिक देवाणघेवाण होण्यापेक्षा तिथंही आता राजकारणाने जागा घेतली. राजकारणी बनू पाहणारे साहित्यिक यातून कधी बाहेर पडणार हाच खरा प्रश्न उपस्थित झाला होता.

close