‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ पुन्हा उभे राहतेय

September 11, 2012 5:14 PM0 commentsViews: 32

अमृता त्रिपाठी, न्यूयॉर्क

11 सप्टेंबर

11 सप्टेंबरला अमेरिकेत झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहे. त्या भीषण हल्ल्यात तीन हजार जणांना जीव गमवावा लागला. न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन उत्तुंग इमारतीही जमीनदोस्त झाल्या. न्यू यॉर्कच्या मानबिंदू असलेल्या या इमारतींना पुन्हा उभारल्या जाताहेत आणि आता त्यातल्या एका इमारतीचं बांधकाम पूर्ण होत आलंय.

11 सप्टेंबर 2001..अमेरिकेवर सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला झाला तो काळा दिवस..या हल्ल्यात पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या उत्तुंग इमारतीचं नव्यानं बांधकाम आता हळूहळू पूर्ण होत आलंय.

वर्ल्ड ट्रेड सेंटरची ही इमारत 2013 साली म्हणजे 9/11 हल्ल्याच्या तब्बल 13 वर्षांनंतर बांधून पूर्ण होईल. हल्ल्याला अकरा वर्ष पूर्ण झालीयत आणि ही इमारत पुन्हा उभी राहताना दिसत आहे. आज इथे बांधकाम करणार्‍या कामगारांपेक्षा मीडियाचीच गर्दी जास्त आहे. गेल्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नांना आलेलं हे यश आहे.

कंस्ट्रक्शन एक्झिक्युटिव्ह मॅल्कोल्म विलियम्स म्हणतात, ही इमारत खूप काही सांगते..न्यूयॉर्क पुन्हा उभं राहिलंय, अमेरिका पुन्हा उभी राहिली.

ही इमारत 977 फूट उंच आहे. इथेच उभी राहणारी वर्ल्ड ट्रेड सेंटरची दुसरी इमारत या भागातली ही सर्वात उंच इमारत असेल. त्या इमारतीत 105 मजले असतील. इथून 9/11 चं स्मारक दिसतं जिथे अकरा वर्षांपूर्वी त्या दोन देखण्या इमारती उभ्या होत्या.

सिल्वेरस्टाईन प्रॉपर्टीज मार्केटींग अँड कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष दारा मॅक्युलन म्हणतात, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या या नव्या इमारतीचं बांधकाम, वास्तू, वाहतूक सर्वच उच्च दर्जाचं आहे. न्यू यॉर्कमधली ही सर्वोत्तम इमारत आहे. न्यूयॉर्कच्या या मॅनहॅटन नावाच्या गजबजलेल्या भागात.. शांतपणे जीवन नव्यानं फुलतंय.

close