अजितदादा मेहरबान, ठेकेदार पेहलवान !

September 24, 2012 4:06 PM0 commentsViews: 23

प्रशांत कोरटकरसोबत आशिष जाधव, मुंबई

24 सप्टेंबर

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 38 प्रकल्पांना 2009 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी दिली. विशेष म्हणजे या 38 प्रकल्पांच्या कामांची किंमत चार पटीने वाढवण्यात आली. त्यामुळे प्रकल्पांच्या ठेकेदारांना 26 हजार 722 कोटी रुपयांची कामे बहाल करण्यात आली. ही सर्व कामे अवघ्या काही महिन्यात.. घाईघाईत.. आणि नियमांना धाब्यावर बसवून मंजूर करण्यात आली.

गेल्या 13 वर्षांपासून जलसंपदा खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे. आधी शरद पवारांचे विश्वासू डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यानंतर 2004 ते ऑक्टोबर 2009 पर्यंत अजित पवार हे राज्याचे जलसंपदामंत्री आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. पण खर्‍या अर्थाने अजित पवारांच्या काळात गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पासह विदर्भातील अनेक प्रकल्पांच्या कामांच्या निविदा निघाल्या. त्यातल्याच 2009 मध्ये विदर्भ पाटबंधारे महामंडळाने जारी केलेल्या 38 प्रकल्पांच्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे येतंय.

आयबीएन-लोकमतच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, अजित पवार आणि महामंडळाचे कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के यांनी मोठ्या खुबीने.. 38 प्रकल्पांपैकी 32 प्रकल्पांच्या कामांना केवळ तीन महिन्यांमध्ये घाईघाईत मंजुरी दिली.

32 वादग्रस्त प्रकल्प- जून 2009 ते ऑगस्ट 2009 या तीन महिन्यांमध्ये गोसीखुर्द प्रकल्प वगळता 32 योजनांच्या निविदा काढण्यात आल्या- यातल्या बहुतेक निविदा 200 टक्के वाढीव रकमेच्या आहेत- त्यामुळं निविदा जारी करताना या प्रकल्पांची किंमत मूळ किमतीच्या चार पटीनं वाढवली गेली- मूळ किंमत 6 हजार 672 कोटी रुपये असताना ठेकेदारांना 26 हजार 722 कोटी रुपयांची कामे बहाल करण्यात आली- महामंडळाकडे पुरेसा निधी नसताना अव्वाच्या सव्वा दरानं ही कामं ठेकेदारांना बहाल करण्यात आली- शासकीय प्रक्रियेला धाब्यावर बसवत या योजनांना मंजुरी देण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मात्र अजित पवारांच्या कृतीचं समर्थन करत आहे. सर्व 38 प्रकल्पांच्या कामांच्या किमती वाढवल्या गेल्यामुळे साहजिकच एकाही प्रकल्पाचं काम सुरळीत सुरू झालेलं नाही. त्यामुळे हजारो कोटींची कंत्राटं निघूनही विदर्भ तहानलेलाच आहे.

close