कुस्तीपटू खेडकरांचा जगण्यासाठी संघर्ष

September 26, 2012 3:33 PM0 commentsViews: 38

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

26 सप्टेंबर

महाराष्ट्रातील कुस्तीच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार असणारे महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांचा सध्या जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आपल्या सुवर्णमय कामगिरीनं महाराष्ट्रचं नाव उंचावणारे पैलवान खेडकर यांना औषधोपचारासाठी सध्या मदतीची गरज आहे.

नवे खेड गावच्या या वाटा आताशी शांत झाल्यात…कुस्तीच्या विजयोत्सवाच्या मिरवणुकीनं एकेकाळी या वाटा दुमदुमून जायच्या.आताशा भग्नावस्थेत असलेल्या या घरानं एकेकाळी कुस्तीचं वैभव अनुभवलंय. दोन वेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे गणपतराव खेडकर विपन्न अवस्थेत येथे आयुष्याशी झुंजत आहे.

कुस्तीचं फड गाजवणार्‍या गणपतरावांनी हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदारांसहीत अनेक कुस्तीपटूंना घडवलं. अजुनही कुस्ती हाच त्यांचा श्वास आहे. स्वप्न अनेक असली तरी त्यासाठी शरीर मात्र साथ देत नाही. ऑपरेशनसाठीचे 4 लाख रुपये आणायचे कुठून हाच त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे.

मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ही रक्कम जमवणं शक्य नाहीय. त्यामुळ खेडकर सध्या घरीच उपचाराविना आजारपणाशी संघर्ष करतायत. विशेष म्हणजे या उपचारानंतरही पैलवान खेडकर नव्या मल्लांना तयार करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहेत.

आजारपणानं त्रस्त असतानाही पैलवान खेडकरांना त्यांच्या कुस्त्यांचा काळ आठवला तर त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं सध्या त्यांना चालताही येत नाही मात्र वयाच्या 70 व्या वर्षीही ते आपल्या कुस्त्यांच्या जुन्या आठवणी आवर्जून सांगतात.

पैलवान खेडकरांच्या उपचारासाठी लागणार्‍या खर्चामुळं त्यांचं कुटुंबही सध्या चिंतेत आहे. आपल्या वडिलांनी आपल्या गावचं आणि भागाचं नाव उंचावलं मात्र आज त्यांना मदत करायला कोणाीही तयार नाही याची खंत त्यांच्या मुलांना वाटतेय.

खेडकरांच्या कार्याचा आणि त्यांच्या यशाचा सांगली जिल्ह्यातल्या कुस्ती प्रेमींना सार्थ अभिमान आहे. मात्र त्यांची अवस्था पाहून कुस्ती क्षेत्रातूनही मदतीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

पैलवान खेडकर यांना सरकारकडून मिळणारं तुटपुंज मानधनंही गेल्या 2 वर्षांपासून बंद झालंय. त्यामुळे सध्या खेडकर कुटुंबाचा उदनिर्वाह हा फक्त शेतीवरचं सुरुय. त्यातचं आता या आजारपणाच्या उपचारांसाठी सरकारकडून मदत होईल हीच अपेक्षा खेडकर कुटुंबीय ठेऊन आहे.

close