राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा

September 26, 2012 1:25 PM0 commentsViews: 9

26 सप्टेंबर

अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची 'ब्रेकिंग न्यूज' धडकताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. याचा निषेध करत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परभणीमध्येही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

बीडमध्ये पदाधिकार्‍यांचे राजीनामे

तर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे दिले आहेत. आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्लाह, शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्यासह 6 जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. क्षीरसागर यांनी चर्‍हाटा फाटा इथे रास्ता रोको आंदोलनही केलं.

मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात राजीनाम्याचा ठराव

दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेतल्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या जिल्हापरिषदेत हा ठराव मंजूर झालाय. जर उपमुख्यमंत्री आरोपांमुळे राजीनामा देत असतील तर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा ठराव मांडण्यात आला. आणि तो राष्ट्रवादीच्या सर्व सभासदांनी मंजूर केला.

close