सिंचन घोटाळ्यात भाजप-राष्ट्रवादीचं साटंलोटं

September 26, 2012 4:52 PM0 commentsViews: 22

आशिष जाधव, मुंबई

26 सप्टेंबर

विदर्भातल्या सिंचन घोटाळा प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच राजीनामा दिला. पण या 'वॉटरगेट' प्रकरणाचा पसारा खूप मोठा आणि धक्कादायक आहे. या घोटाळ्यात भाजपच्या कंत्राटदारांशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं साटंलोटं असल्याचं उघड झालाय. भाजपचे खासदार अजय संचेतींनी गैरमार्गाने कंत्राटं मिळवली आहे. अजय संचेती हे भाजपचे अध्यक्ष गडकरींचे निकटवर्तीय असून विशिष्ट कंत्राटदारांच्या फायद्यासाठी अजित पवारांनी नियम शिथिल केले.आयबीएन लोकमतच्या हाती या सर्व कागदपत्रांचे पुरावे असून राष्ट्रवादीच्या 'दादा' घोटाळ्याचा हा एक पुरावा आहे.

विदर्भातल्या गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पासह अनेक मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांची कामं अजय संचेती यांच्या कंपन्यांना मिळाली आहेत. ही कामं मिळवताना त्यांनी कायद्याचं सर्रास उल्लंघन केलंय. एवढंच नाही तर त्यासाठी अजय संचेती यांना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनीच मदतकेल्याचं उघड झालंय.पुढारी आणि ठेकेदार संगनमताने पाण्यासारखा पैसा स्वतःच्या पदरात पाडून घेतात, हे आता उघड गुपित आहे. पण विरोधी पक्षाच्या ठेकेदारांशी सत्ताधार्‍याचं कसं साटंलोटं असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाजपचे राज्यसभेतले खासदार अजय संचेती आणि राष्ट्रवादीचे अजित पवार. एका ठेकेदाराला जास्तीत जास्त तीन कामांचंच कंत्राटं देण्याचं बंधन असताना विदर्भात संचेतींसाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले.

संचेती, पवारांचं साटंलोटं- अजय संचेतींच्या मालकीची शक्तीकुमार एम. संचेती लिमिटेड ही कंपनी 1997 पासून काम करतेय- नोव्हेंबर 2005 मध्ये अजय संचेतींनी या कंपनीचे नाव बदलवून एस. एम. एस. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे केले- कंपनी रजिस्ट्रारचा नियम मोडून अजय संचेतींनी 2007 साली दोन्ही कंपन्यांसाठी महामंडळाकडून परवाने मिळवले- हे दोन्ही परवाने 1083 या एकाच ठेकेदार क्रमांकाने महामंडळाने जारी केले- त्यामुळं 2007 आणि 2008 मध्ये दोन्ही कंपन्यांना सिंचनाच्या कामांची कंत्राटं मिळाली- त्यापुढे जाऊन 156 कोटी रुपयांची कामं अजय संचेतींनी डी आणि एस. एन. ठक्कर्स या कंपन्यांबरोबर जॉइंट व्हेन्चर बनवून घेतली

एवढी कंत्राटं गैरमार्गाने मिळवून संचेतींचं समाधान झालं नव्हतं. म्हणून 3 कंत्राटांची मर्यादाच काढून टाकण्याचा घाट घालण्यात आला. 2008 मध्येतत्कालीन जलसंपदा मंत्री आणि विदर्भ सिंचन महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक विशेष परिपत्रक काढलं. त्यात एकाच वेळी तीनपेक्षा जास्त कामं हाती नसावीत, या नियमाला स्थगिती देण्यात आली. या स्थगिती निर्णयामुळं अजय संचेतींसह अनेक ठेकेदारांना एकाचवेळी जादा कामं मिळाली. अजय संचेती हे भाजपच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवारांवर हल्ला करणार्‍या भाजपची अडचण झाली आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बंद व्हाव्यात, यासाठी सिंचनाचं जाळं विदर्भात लवकरात लवकर वाढवावं अशी सूचना राज्यपालांनी केली होती. नेमक्या याच सूचनेचा गैरफायदा घेऊन विदर्भातला सिंचनाचा पैसा पुढारी आणि ठेकेदारांनी लाटला.

close