आता ‘फ्री’ स्टाईल ‘दादा’गिरी !

October 1, 2012 3:58 PM0 commentsViews: 9

01 ऑक्टोबर

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अजित पवारांनी राज्याचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी अजित पवार सोडत नाहीत. विशेष म्हणजे सातार्‍यातल्या युवती मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी ताईंबरोबर शक्तीप्रदर्शन केलं. तर आत्तापर्यंत काँग्रेसवर टीका करणार्‍या दादांची भूमिका सातार्‍यात थोडी मवाळ झालेली दिसली.

मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार अप्रत्यक्षपणे नाव न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अशी आगपाखड करत आहेत. सातार्‍यामध्ये सुप्रिया सुळेंच्या युवती मेळाव्या हजर राहण्याअगोदर मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यात अजित पवारांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं. एवढंच नाही तर, सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या मुद्याचा त्यांनी इथंही पुनरुच्चार केला.

अजित पवारांनी केलेल्या टीकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनतरी शांत राहणंच पसंत केलंय. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मात्र सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरुन राष्ट्रवादीकडं बोट दाखवताहेत.

राजीनामा नाट्यावर अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत जबाबदार धरणार्‍या अजित पवारांनी अचानक आपला पवित्रा बदलत विरोधकांना टार्गेट केलं.विरोधकांना लक्ष्य करत अजित पवारांची भूमिका नक्की कुणाच्या सांगण्यावरुन मवाळ झाली, याची चर्चा दिवसभर होती. आता हा संघर्ष कितीकाळ चालणार आणि त्यात कोण सरस ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

close