अबब 200 कोटींचे कामं गेली अडीच हजार कोटींवर !

October 10, 2012 9:12 AM0 commentsViews: 29

माधव सावरगावे, औरंगाबाद

10 ऑक्टोबर

मराठवाड्यात सिंचनाचं क्षेत्र वाढावं म्हणून गोदावरी खोर्‍यात 11 बंधारे बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं. पण या बंधार्‍यांच्या कामांमध्ये वाढीव रकमेच्या निविदा काढून कोट्यावधी रुपयांची लूट करण्यात आल्याचं उघड झालं आहे. 2007 मध्ये 200 कोटींचे असलेले हे बंधारे आज रेकॉर्डवर अडीच हजार कोटींचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा अजित पवार जलसंपदामंत्री असताना झाला आहे.

मराठवाडयातल्या गोदावरी खोर्‍यातल्या औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये 2007 साली 11 बंधारे बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं. आजघडीला यातल्या काही बंधार्‍यांचं काम पूर्ण झालंय तर काही अर्धवट स्थितीत आहेत. पण 2007 मध्ये जेमतेम 200 कोटींचे असलेले हे बंधारे आज सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार कागदावरच 2500 कोटी रुपयांचे झाले आहे.

धरणांच्या किंमती फुगल्याऔरंगाबाद जिल्हयातल्या आपेगाव आणि हिरडपुरी येथील 2 बंधार्‍यांची मूळ किंमत होती 43 कोटी 85 लाख रुपये आता ती 318 कोटी 47 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. तर जालना जिल्हयातल्या राजा टाकळी, मंगरुळ आणि जोगळादेवी येथील 3 बंधा-याची किंमत 71 कोटी 3 लाखावरून 403 कोटी 58 लाखापर्यंत वाढवली गेली. तसेच परभणी जिल्हयातल्या मुदगल, ढालेगाव, लोणी सावंगी, मुळी, दिग्रस आणि आमदुरा या 6 ठिकाणच्या बंधार्‍यांची किंमत 137 कोटी 14 लाखावरून 570 कोटी 86 लाख रुपये वाढवण्यात आली.

अशाप्रकारे राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानं या 11 बंधार्‍यांची किंमत 9 पटीनं वाढवण्यात आलीय. हा सगळा फेरफार अधिकारी आणि तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या मर्जीनं झाल्याचा आरोप होतोय.

आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामं मिळवून देण्याबरोबरच अनेक ठिकाणी बिगर निविदा जोडून कोट्यवधींची कामं देण्यात आली. या बंधार्‍यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली. ट्रायल बोअरच्या कामातल्या गैरव्यवहाराची तर तत्कालीन जलसंधारण सचिव एम.के.कुलकर्णी यांनी चौकशीसुद्धा केली. पण एम. के. कुलकर्णी मराठवाडा सिंचन मंडळाचे कार्यकारी संचालक असतानाच ही काम झाल्यानं चौकशीचा अहवालच गुलदस्त्यात ठेवला गेला. त्यामुळेच या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी भाजपने केली आहे.

व्हायचं तेच झालं… कागदावर किंमत वाढवून ठेकेदारांनी पैशांची लूट केली. पण आता मराठवाडा सिंचन मंडळाकडं बंधारे पूर्ण करायला पैसा नाही. त्यामुळं गोदावरी खोर्‍यातले बंधारे पुढची अनेक वर्षे असेच कोरडे राहतील, असं दिसतंय.

गोदावरी खोर्‍याचं मातेरंआपेगाव आणि हिरडपुरी (औरंगाबाद)मूळ किंमत – 43 कोटी 85 लाख रु.वाढलेली किंमत – 318 कोटी 47 लाख रु.राजा टाकळी, मंगरूळ, जोगळादेवी (जालना)मूळ किंमत – 71 कोटी 3 लाख रु.वाढलेली किंमत – 403 कोटी 58 लाख रु.

मुगल, ढालेगाव, लोणी सांगवी, मुळी, दिग्रस, आमदुरा (परभणी)मूळ किंमत – 137 कोटी 14 लाख रु.वाढलेली किंमत – 570 कोटी 86 लाख रु.

close