दहशतवादाविरोधात लढणारी 14 वर्षांची रणरागिणी

October 12, 2012 12:11 PM0 commentsViews: 28

12 ऑक्टोबर

पाकिस्तानात तालिबान्यांविरोधात आवाज उठवणार्‍या किशोरवयीन मलाला युसूफझई हिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. 9 ऑक्टोबरला मलाला हिला तालिबानी बंडखोरांनी गोळी घालून मारण्याचा प्रयत्न केला. पण यात ती बचावलीय. तिच्यावर हल्ला करणार्‍यांचीही ओळख पटल्याचं पाकिस्तान सरकारनं सांगितलंय. मलालावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातून निषेध होतोय.

 

मलाला युसूफझई… तालिबान्यांचं वर्चस्व असलेल्या स्वात खोर्‍यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या मिंगोराची राहणारी..सामान्य दिसणार्‍या या असामान्य मुलीनं वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी तालिबानी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. तिनं 2009 साली तालिबान्यांच्या अत्याचाराविषयी लिहिलेली डायरी बीबीसीनं प्रसिद्ध केली आणि या चिमुकल्या रणरागिणीची ओळख जगाला झाली. त्यानंतर तिनं स्वत:चा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. आज चौदा वर्षांची असलेल्या मलालाला तालिबानी बंडखोरांनी गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिची बस अडवली आणि तिचं नाव घेत बेछूट गोळीबार केला. गोळी मलालाच्या डोक्याला लागून तिच्या खांद्यात गेली. इतर दोन मुलीही जखमी झाल्या. तालिबान्यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय. तालिबानी पत्रक’मलाला आता बचावली तरी पुढे वाचणार नाही. आम्ही नक्कीच तिला ठार मारू. स्थानिक पश्तून लोकांच्या मूल्यांच्या विरुद्ध ती धर्मनिरपेक्ष आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा पुढाकार करते.’ – तालिबान

मलालाच्या वडिलांची मुलींची शाळा होती. ती आता बंद आहे. पण त्यांनी मलालाला नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यांच्या कुटुंबाला गेल्या तीन वर्षात तालिबान्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आणि आता तर त्यांच्या मुलीलाच ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपण मिंगोरा सोडून कुठेही जाणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.

मलालाच्या धाडसाबद्दल गेल्या वर्षी तिला राष्ट्रीय शांतता पुरस्कारही बहाल करण्यात आला. मलालावर हल्ला करणार्‍यांची ओळख पटल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितलं. पण या हल्लेखोरांना शिक्षा करण्याचं धाडस सरकार दाखवेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

close