धरणानं आणलं शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी !

October 13, 2012 11:41 AM0 commentsViews: 17

सतीश पाटील, जळगाव

13 ऑक्टोबर

शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचं राजकारण कसं केलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं पाडसळे धरण..युती सरकारच्या काळात या धरणाचं काम सुरू झालं. पण 14 वर्षं उलटूनही अजून ते अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळे 80 टक्के खडकाळ असलेल्या अमळनेर तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

गेल्या 14 वर्षांपासून इथले शेतकरी धरणाकडे डोळे लावून बसले आहे. पण धरणाचं कामं मोजकचं झालं आहे. तापी नदीवरचं हे सर्वात मोठं पाडसळे धरण..जळगाव जिल्ह्यातल्या कोरडा अमळनेर तालुका या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी लोकांच्या जमिनी गेल्या. शेतकर्‍यांना शेतमजूर व्हावं लागलं. पण पाणी मात्र अडलं नाही.

धरणक्षेत्रात येणार्‍या 18 गावांचं पुनर्वसन अजून झालेलं नाहीय. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून या गावात कोणत्याच सरकारी योजना आल्या नाहीत. जमिनी आणि घरांच्या व्यवहारावर निर्बंध आल्यानं लोकांची कोंडी झाली.

गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर तालुक्यातलं राजकारण फक्त या पाडसळे धरणाभोवती फिरतंय. पण तालुक्याच्या पदरी मात्र काहीच पडलेलं नाही. हे धरण कधी पूर्ण होणार आणि अमळनेरचा ही खडकाळ जमीन कधी फुलणार याचं उत्तर सध्यातरी नाहीय.

close