भोंदूगिरी करणारं दांपत्य गजाआड

October 23, 2012 2:20 PM0 commentsViews: 37

अद्वैत मेहता, पुणे

23 ऑक्टोबर

पुण्यातील उच्चशिक्षित तरूणीला मंत्राने सिध्द केलेली रूद्राक्षाची माळ देऊन वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवतो अशी भूलथाप देऊन 53 हजार रूपये उकळणार्‍या तसंच बाहेर याची वाच्यता केल्यास धमकी देऊन धक्काबुक्की करणार्‍या सुमंत मुखर्जी आणि सीमा मुखर्जी या भोंदूगिरी करणार्‍या दांपत्याला पुणे पोलिसांनी गजाआड केलंय. अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर पुढं येऊन पोलीसात तक्रार दाखल करण्याचं धाडस दाखवणार्‍या तरूणीचं अंधश्रध्दा निर्मूलन समितीनं स्वागत केलं असून जादूटोणा विरोधी कायदा असला असता कडक कारवाई झाली असती असं मत व्यक्त केलंय.

शिक्षणाचा शहाणपणाशी संबंध नाही.. हे पुण्यातल्या एका उच्चशिक्षित तरुणीच्या व्यथेमुळे सिद्ध झालंय. मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी या महिलेने मृगांक मुखर्जी नावाच्या भोंदूची मदत घेतली. मंतरलेल्या रुद्राक्षांची माळ देऊन समस्या सोडवतो, अशी जाहीरात त्याने एका बड्या इंग्रजी पेपरमध्ये दिली होती. या जाहिरातीला बळी पडलेल्या या महिलेकडून मुखर्जीने तब्बल 53 हजार रुपये उकळले. अखेर फसवलं गेल्याचं लक्षात येताच या तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे याआधीही तिची एका भोंदूबाबाकडून फसवणूक झाली होती.

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात उच्चशिक्षित समाजातही अंधश्रद्धा पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त होतेय. प्रलंबित असलेला जादूटोणा विरोधी कायदा असता तर अशा गोष्टींना चाप बसला असता असं मत नरेंद्र दाभोळकर यांनी व्यक्त केलंय.

पोलिसांनी फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय आणि फसवणूक झालेल्या इतरांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहनही केलंय.

close