काळजी बाळासाहेबांची !

November 15, 2012 4:12 PM0 commentsViews: 46

15 नोव्हेंबर

सर्वाना चिंता लागलेली आहे ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची…आज सकाळपासूनच मातोश्रीवर विविध पक्षांचे नेते, बॉलीवूड आणि औद्योगिक क्षेत्रातल्या व्यक्तींची रीघ लागली आहे. आज दिवसभरात काय घडलं त्यावरचा हा रिपोर्ट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळताच बुधवारी रात्री मातोश्रीकडे शिवसैनिकांची रीघ लागली. विविध पक्षातले नेते, तसंच अमिताभ बच्चन यांच्यासारखे बॉलीवूडचे अभिनेतेही बाळासाहेबांच्या चिंतेपोटी मातोश्रीवर दाखल झाले. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं.आणि वातावरण थोडसं निवळलं. सकाळपासून पुन्हा बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसैनिक आणि इतर पक्षातल्या नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतली.दुपारी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे रामदास आठवले मातोश्रीवर गेले. केंद्रीय कृषीमंत्री आणि बाळासाहेबांचे खास मित्र शरद पवार यांनीही बारामतीहून थेट मुंबई गाठत बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली. दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के. शंकर नारायणन यांनीही मातोश्रीवर येऊन विचारपूस केली. एकीकडे राजकीय नेत्यांची रिघ लागली असताना उद्योग क्षेत्रातील दिग्गज वेणूगोपाल धूत आणि राहुल बजाज यांनीही मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांची चौकशी केली.सिनेसृष्टीतल्याही अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. सकाळी नाना पाटेकर येऊन गेला. त्यानंतर दुपारी दिग्दर्शक मधुर भांडारकर, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, रणधीर कपूर, राजू कपूर ऋषी कपूर, विक्रम गोखले, गोविंदा यांनीही मातोश्री गाठली. लता मंगेशकर यांनी बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थामुळे आपला म्युझिक कंपनीचा नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचं जाहीर केलं. सर्वांनीच बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.

close