गुगल अर्थविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

December 19, 2008 5:18 PM0 commentsViews: 4

19 डिसेंबर मुंबईरोहिणी गोसावीदहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यांच्या कटाची आखणी करण्यासाठी गुगल अर्थ या वेबसाईटचा वापर केला होता हे आता सिद्ध होत आहे. याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही वेबसाईट धोक्याची आहे अशी टीका होत आहे . 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबनं, गुगल अर्थ वेबसाइटवर मुंबईतली महत्त्वाची ठिकाणं दाखवली गेल्याचं सांगितलं. त्यामुळे गुगल अर्थ वेबसाईट ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोक्याची ठरत आहे हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. 26/11 चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला. त्यानंतर पकडलेला दहशतवादी कसाबनं दिलेली माहिती. तसंच लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईड फहीम अन्सीरीनं गुगल अर्थचा वापर करून केलेलं हल्याचं प्लॅनिंग.या सगळ्या पार्श्वभूमीवर गुगल अर्थ या वेबसाईटवर बंदी घालावी यासाठी एक जनहीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. याचिकाकर्त्ते अ‍ॅड.अमित कारखानीस यांनी या याचिकेत गुगल अर्थवर दिसणा-या इमेजेसमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.गुगल अर्थ वेबसाईटवर जगातल्या कुठल्याही भागाचा नकाशा स्पष्टपणे पाहता येतो. फहीम अन्सारीला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडून मुबईतलं सीएसटी स्टेशन, ताज हॉटेल अशा काही महत्त्वाच्या ठिकाणाचे नकाशे त्यांनी जप्त केले होते. गुगल अर्थवरून कोणतंही ठिकाण शोधणं खूप सोपं असतं. गुगल अर्थवर बंदी घालण्याच्या बाबतीत तज्ज्ञाची मतं मात्र वेग-वेगळी आहेत. मुंबई हाय कोर्टात आता या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. गुगल अर्थमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो हे कोर्टात सिद्ध झालं तर कदाचित या वेबसाईटवर बंदीही येऊ शकते.

close