महिलांच्या समस्या दारावर, आयोग वार्‍यावर !

December 25, 2012 12:17 PM0 commentsViews: 155

विनोद तळेकर,मुंबई

25 डिसेंबर

महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार्‍या महाराष्ट्र राज्य महिला आयोग या सरकारी महामंडळात, गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षपदावर नियुक्तीच झालेली नाही. दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच, या महामंडळाची दयनीय अवस्था दाखवणारा हा एक स्पेशल रिपोर्ट…

गेली चार वर्ष अध्यक्षांची वाट पाहाणारी ही खुर्ची आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची ही केबीन. 2009 ला ऍड. रजनी सातव यांच्यानंतर या पदावर कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. अध्यक्षांच्या गैरहजेरीत सध्या या आयोगाचा संपूर्ण कारभार आयोगाच्या सदस्य सचिव शोमिता बिश्वास पाहातात.

फक्त अध्यक्षांचं पदच नव्हे तर उपसचिव, प्रशासकीय अधिकारी आणि इतरही काही पदं अजूनही रिक्त आहेत. अनेक कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात आले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे इथल्या कोणत्याही कर्मचार्‍याला प्रोव्हीडंट फंड सारख्या शासकीय सोयीसुद्धा मिळत नाहीत. पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने सध्या आयोगासमोर 1589 तक्रारी प्रलंबित आहेत.

राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढत असताना.. इतक्या महत्त्वाच्या आयोगाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रश्नाबाबत सरकार अजिबात गंभीर नाहीये, असा आरोप विरोधकांनी केलाय. आयोगातली रिक्त पदं एका महिन्यात भरू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात दिलं होतं. पण सहा महिने उलटूनही परिस्थिती जैसे थे अशीच आहे.

महिला आयोगाला अध्यक्ष नाही !- उपसचिव, प्रशासकीय अधिकारी आणि इतरही महत्त्वाची पदंही रिक्त – अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर – कोणत्याही कर्मचार्‍याला प्रोव्हिडंट फंडसारख्या सुविधा नाही- पुरेसे कर्मचारी नसल्याने आयोगासमोर 1589 तक्रारी प्रलंबित

close