बाळासाहेबांच्या जयंतीदिनी सेनेकडून ‘स्मारकार्पण’?

December 26, 2012 4:56 PM0 commentsViews: 19

विनोद तळेकर, मुंबई

26 डिसेंबर

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक लवकरात लवकर तयार करून 23 जानेवारी म्हणजे बाळासाहेबांच्या वाढदिवशी त्याचं उद्घाटन करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या धुरीणांनी कामाला सुरूवात केलीय. पण या प्रक्रियेत हायकोर्टाचा खेळाच्या मैदानाबाबतचा एक जुना निर्णय अडथळा ठरू शकतो.

बाळासाहेबांची जयंती आता महिन्याभरावर आलीये. त्यामुळे स्मारकासाठी शिवसेनेत नव्याने धावपळ सुरू झालीये. पण मुंबई हायकोर्टाने 2006 साली खेळाच्या मैदानाबाबत दिलेला हा निर्णय त्यांना अडचणीचा ठरू शकतो. मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू विरुद्ध विले पार्ले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या केसमध्ये हायकोर्टाने खेळाची मैदानं वाचवणारा आदेश दिला. खेळासाठी राखीव असलेलं मैदान अन्य कोणत्याही कामासाठी वापरू नये, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं.

शिवसेनेने शिवाजी पार्कमधली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारची ही जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निश्चित केलीय. महापालिकेने अजूनही या जागेवर उद्यान बांधण्यासाठी अंतिम मान्यता दिलेली नाही.

शिवाजी पार्कवरील रहिवाश्यांच्या मते शिवाजी पार्कवर अगोदरच दोन बागा आहेत. त्यात बाळासाहेबांच्या स्मारकाची आणखी एक बाग तयार करण्यापेक्षा अगोदरच अस्तित्वात असलेल्या आजी आजोबा उद्यानाचं नूतनीकरण करून त्यालाच बाळासाहेबांचं नाव द्यावं, जेणेकरून बाळासाहेबांच्या स्मृतीही जपल्या जातील आणि कायदेशीर अडचणीही येणार नाहीत. पण त्या अगोदर महापालिका शिवसेनेच्या प्रस्तावावर काय निर्णय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close