तरुणांनी घेतली दहशतवादाविरोधात शपथ

December 20, 2008 2:49 PM0 commentsViews: 2

20 डिसेंबर, मुंबईनेहमीच राजकीय पक्षांच्या मेळाव्यांनी गजबजणारं दादरचं शिवाजी पार्क आज तरुणांच्या गर्दीनं ओंसडून वाहत होतं. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांची गर्दी शिवाजीपार्कवर एकटवली होती. तीन विद्यापीठातले विद्यार्थी हजारोंच्या संख्येनं एकत्र आले होते. राज्यपाल एस. सी. जमीर यांनी विद्यार्थ्यांना दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी शपथ दिली. आतापर्यंत जंगी राजकीय सभा पाहणार्‍या शिवाजीपार्कवर विद्यार्थ्यांचा हा सागर अभूतपूर्व असा होता. शिवाजी पार्कवरील भव्य व्यासपीठावर एटीएस दलाचे प्रमुख शहीद हेंमत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे, शहीद एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन् यांचे वडील के. उन्नीकृष्णन् उपस्थित होते. दहशतवादाविरोधात शपथ घेण्यासाठी हजारोच्या संख्येनं आलेल्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना कविता करकरे म्हणाल्या की मुलांशी गप्पा मारताना त्यांचा तणाव पळून जायचा. ते नेहमी म्हणायचे जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रत्येक जण ध्येय साध्य करू शकतो. जेवढी त्याची कीर्ती वाढते, तेवढाच त्याचा नम्रपणा वाढतो. नम्रता हा मनुष्य स्वभावाचा सर्वाच्च गुण आहे. आपण समाजाचा अंश असल्यानं आपण समाजाला वेगळं करू शकत नाही. समाजाप्रती असलेली स्वत:ची जबाबदारी झटकू शकत नाही. समाजासाठी स्वता:हून काय केलं पाहिजे, यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. समाजाचं आपल्यावरील उपकार फेडण्यासाठी आपलं आयुष्यही कमी आहे. हेंमत यांच्या आठवणी सांगताना मला अभिमान वाटतोय. मुलांनो तुम्ही जिद्द निर्माण करा. तुमच्यातही हेंमत करकरे निर्माण करा. हेंमत वॉज ए हिरो, ही डाय एज ए हिरो.' टाळ्यांच्या गजरात तरुणांनी भाषणांचं स्वागत केलं. के. उन्नीकृष्णन यांचं भाषण ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होतं. ' मी 65 वर्षांचा आहे. मला देशासाठी लढायला बोलवलं तर कधी ही जाईल. मी माझा मुलगा गमावलाय. पण माझ्यासमोर हजारो संदीप कृष्णन् दिसत आहेत. राज्य, प्रांत सोडून देशासाठी लढा. बी इंडियन, प्राउड टू बी इंडियन ', असं के. उन्नीकृष्णन् यांनी सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भाषणानंतर राज्यपालांनी उपस्थितांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी शपथ दिली. यामध्ये एसएनडीटी, मुंबई विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.

close