शिवसेना-मनसेत धुसफूस !

January 10, 2013 5:14 PM0 commentsViews: 37

विनोद तळेकर, मुंबई

10 जानेवारी

सध्या शिवसेना आणि मनसेत नाराज नेत्यांची संख्या वाढतेय. ठाकरे बंधंुच्या कार्यपद्धतीबाबत या दोन्ही पक्षातल्या नाराजांनी कधी थेट तर कधी आडून हल्ला चढवलाय. आणि या सगळ्याचा फायदा उठवायला राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावलीय. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव प्रकरणातून ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतलाय. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या दुष्काळी परिस्थितीचं जरी कारण दिलंय. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरूवात झालीय.

राज ठाकरे असोत की उद्धव ठाकरे दोघांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्यांची संख्या दोन्ही पक्षात वाढतेय. पुर्वी शिवसेनेतले नाराज मनसेत जाण्यासाठी इच्छुक असत तर मनसेतले नाराज शिवसेनेत परतल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण मनसेतून शिवसेनेत गेलेल्या संजय घाडी, श्वेता परूळकर, प्रकाश महाजन आणि राजा चौघुले यांच्या सारख्या नेत्यांना सध्या शिवसेनेत साईड ट्रॅक केलं गेलंय. तर शिवसेनेत नाराज असलेल्यांना मनसेनेही प्रवेश देण्याबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाहीए. त्यामुळेच नाराजांनी राष्ट्रवादीचा पर्यायाचा विचार सुरू केलाय.

सध्या तरी राष्ट्रवादीने निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातल्या नेत्यांना आपल्या गोटात खेचायला सुरूवात केलीय. पण त्यांना पक्षात लगेचच प्रवेश न देता त्यांची आमदारकी किंवा खासदारकी कायम ठेवत त्याचा फायदा राष्ट्रवादीला कसा होईल याची तजवीज केलीय. आता हर्षवर्धन जाधव असोत किंवा शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे असोत या दोन्ही उदाहरणावरून ही बाब स्पष्ट होतेय. कदाचित 2014 साली स्वबळावर निवडणुका लढवण्याची ही तयारी असावी.

close