जाधव म्हणतात, 10 लाख मोठे नाही !

January 10, 2013 1:50 PM0 commentsViews: 6

10 जानेवारी

माझ्या उमेदवारीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पीएनी 5 लाख रूपये घेतले होते असा आरोप करणारे मनसेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आता पक्षाने उपसभापतीपदासाठी 10 लाख रूपये घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना जाधव म्हणतात, उपसभापतीपदासाठी 10 लाख रूपये मोठे नाही. राजकारणी,नगरसेवक,मोठ-मोठ्या गाड्यातून फिरतात, टोलजंग इमारती बांधतात त्यामुळे हा काही 'बिग इशू' नाही असा अजब बचाव हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. आज हर्षवर्धन जाधव यांनी चोविस तासाच्या आत आपल्या आमदारकीचा राजीनामा मागे घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचे मतपरिवर्तन झाले आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आमदारकीचा राजीनामा देणं योग्य नाही असं अजित पवार यांनी जाधव यांना सल्ला दिलाय. त्यांचा सल्ला ऐकून जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय. याबद्दल खुद्द जाधव यांनी कबुली दिलीय. पण आमदारकी मागे घेतली असली तरी मनसेमध्ये परतणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जाधव यांनी बुधवारी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

close