बलात्कार पीडित आर्थिक मदतीपासून वंचितच !

January 12, 2013 1:02 PM0 commentsViews: 35

अलका धुपकर, मुंबई

12 जानेवारी

बलात्काराविरोधात देशभरात आंदोलनं झाली. बलात्कार करणार्‍याला काय शिक्षा द्यावी, यावर चर्चा झाली. पण, बलात्कार पीडिताला आर्थिक मदत करण्यासाठीच्या योजनांबद्दल सरकार चकार शब्द बोलायला तयार नाही. कोर्टाने पीडिताला आर्थिक मदत देण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. स्वत:च्या मुलीवर नवर्‍याने बलात्कार केल्यानंतर न्यायासाठी लढणार्‍या झुंजार माय-लेकींनाही आर्थिक मदत मिळालेलीच नाही.

मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये स्वत:च्या सहाव्या बाळाला जन्म देण्यासाठी ही माय दाखल होती. तेव्हा तिचा पती स्वत:च्याच 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत होता. तीन वेळा तिच्यावर बलात्कार केल्यानंतर मुलगी आईकडे धाय मोकलून रडली. या प्रकरणी तिच्या पतीला अटक झाली आणि तिच्या मुलीला दोन वर्ष चिल्ड्रन होममध्ये ठेवण्यात आलं. आता तिलाही घरी पाठवण्यात आलंय. तिला शिकवण्यासाठी या माऊलीला सकाळचा नाश्ता बंद करावा लागलाय. नवर्‍याला तुरुंगात पाठवल्यामुळे सासरच्यांनी या माय लेकरांना घरातूनच हाकललंय. ही माय लेकं एका छोट्या पत्राच्या घरात राहतात. तेही खाली करण्यास दबाब टाकला जात आहे. खरंतर कोर्टात दिलेल्या लढाईनंतर बलात्कार पीडितांना आर्थिक मदत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. पण मदत तर दूरच यांची साधी विचारपूसही केली जात नाही.

close