दुष्काळाच्या झळा,शिक्षणापासून विद्यार्थी वंचित

January 18, 2013 3:00 PM0 commentsViews: 41

माधव सावरगावे, अंबड-जालना

18 जानेवारी

मराठवाड्यातला दुष्काळ आता सर्वांच्याच जीवावर उठलाय. पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. दररोजच्या गरजा पूर्ण कशा कराव्यात या चिंतेत असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबवण्याची वेळ आलीय.

जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरी इथली शिवकन्या शिंदे…गावापासून 31 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबडच्या मत्सोदरी कॉलेजमध्ये बीएसएस्सीचं शिक्षण घेते. पण आता हे शिक्षण थांबवण्याची वेळ तिच्यावर आलीय. कारण गरिबीचे चटके सहन करीत शिक्षण घेणार्‍या शिवकन्याला आता दुष्काळानं घेरलंय. सध्या कॉलेजच तिच्या बसच्या पासचे पैसे भरतंय. ही स्थिती एकट्या शिवकन्याची नाही. तर मराठवाडयातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि शेतमजुराच्या मुलांची हीच स्थिती आहे. महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना बसचा पास दिलाय. पण केवळ पासवर शिक्षण कसं पूर्ण होणार….कारण परीक्षा फी, प्रवेश फी तर भरावीच लागेल.

दुष्काळात होरपळून निघणार्‍या ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणं कसं सुलभ होईल याकडं कुणीही लक्ष देत नाहीय, ही वस्तुस्थिती आहे. फी माफीच्या मुद्याकडं सरकारनं लक्ष दिलं नाही, तर ऐन परीक्षांच्या काळात लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.

close