गरिबीचे चटके सहन करून सीए झाल्यात सावित्रीच्या लेकी

January 24, 2013 3:48 PM0 commentsViews: 73

24 जानेवारी

जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येऊ शकते हे सिद्ध केलंय महाराष्ट्रातल्या एक नव्हे.. दोन नव्हे.. तर 3 तरुणींनी. मुंबईची प्रेमा जयकुमार, पुण्याची कल्पना दाभाडे आणि कोल्हापूरची धनश्री तोडकर या तिन्ही मुलींनी गरिबीवर आणि इतर अनेक समस्यांवर मात करून सीएच्या कठीण परीक्षेत यश मिळवलंय. मला माझ्या सारख्याच लोकांना शिकवायचंय, मदत करायचीये. फक्त मुलीच नाहीच तर मुलंही अक्षरश: रस्त्यावर राहतात. ही परिस्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न करायचाय असं कल्पना दाभाडे सांगते.

लहानपणी वडील सोडून गेल्यानंतर कल्पनाच्या आईला काम करत तिचा सांभाळ करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिला रिमांड होममध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर ती हिंदू महिलाश्रमात जाऊन तिने शिक्षण पूर्ण केलं. पुढे आश्रम सोडून तिला म्हातार्‍या आईची काळजी घ्यायला पुन्हा पुण्याला यावं लागलं. आई वारल्यानंतर मात्र काम करत करत. जिद्दीने तिने अर्धवट सुटलेला सीएचा अभ्यास केला आणि यशही मिळवलं. आणि म्हणूनच तिला गरजवंत मुलींसाठी झटायचं आहे.

तर कोल्हापूर शहराच्या टाकाळा नावाच्या परिसरातल्या गल्लीत राहणार्‍या धनश्रीच्या झोपडीवजा घरात आनंदाचं वातावरण आहे. तिच्या वडिलांचा चहाचा गाडा 2 वर्षांपूर्वी अतिक्रमण विभागानं काढल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी घरात मिठाई आणली. धनश्रीची एक मैत्रीणही या परीक्षेत पास झालीय. या दोघींनी मिळूनच अभ्यास केला होता. धनश्रीच्या या यशानं तिच्या आई वडिलांचा आनंदही गगनात मावेनासा झालाय.

आणि या परीक्षेत मुंबईमधल्या मालाड भागात एका चाळीत राहणारी प्रेमा जयकुमारचं यशही निर्विवाद. तिचे वडील रिक्षा चालवून घर चालवतात. आई गृहिणी. घरातली परिस्थिती बेताची असतानाच तिने चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न पाहिलं. ते तिने फक्त पूर्णच नाही केलं. तर ती देशात या कठीण परीक्षेत पहिली आहे. भल्याभल्यांच्या नाकी नऊ आणणार्‍या या परीक्षेत अव्वल येऊन तिने अनेकांना प्रेरणा दिली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता उभ्या महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करणार्‍या प्रेमा, कल्पना आणि धनश्रीच्या जिद्दीला आयबीएन लोकमतचा सलाम.

close