राजपथावर भारताच्या सामर्थ्याचं दर्शन

January 26, 2013 10:48 AM0 commentsViews: 69

26 जानेवारी 2013

26 जानेवारी आज भारताचा 64 वा प्रजासत्ताक दिन. आज नवी दिल्लीतल्या राजपथावर खास लष्करी संचलन मोठ्या दिमाखात पार पडलं. हे संचलन राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत करण्यात आलं. परेडला सुरूवात होण्यापुर्वी शहीद सैनिकांच्या 'अमर जवान ज्योती' या स्मारकावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भूतान नरेश वांगचूक यांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या या कार्यक्रमात प्रमुख आकर्षणांपैकी एक असतं ते म्हणजे वायुदलाच्या जवानांनी केलेली प्रात्याक्षिकं…आजच्या या प्रात्याक्षिकांद्वारे वायुदलाच्या सामर्थ्याचंही दर्शन झालं. तसेच लष्करी कवायतींनंतर विविध राज्यांच्या चित्ररथांनीही उपस्थित प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. आप आपल्या राज्यातल्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. आजच्या या सोहळ्या दरम्यान कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांचे चित्ररथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तर समूह नृत्याची झलकसुद्धा या सोहळ्याचा एक महत्वाचा भाग असतो. एखाद्या संकल्पनेवरच्या समूहनृत्याने डोळ्यांची पारणं फेडली.

close