राज-उद्धव एकत्र का येणार नाहीत ?

January 30, 2013 5:40 PM0 commentsViews: 153

30 जानेवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनेचे मुखपत्र सामनात मुलाखत दिली आणि पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं.उद्धव यांनी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत पहिल्यांदाच स्पष्टपणे भूमिका मांडली. पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर काहीही बोलायला नकार दिलाय. विश्वसनीय सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला राज यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शिवसेना मनसे नजीकच्या काळात युती होणार नाही हे आता स्पष्ट होतंय. शिवसेना-मनसे एकत्र का येणार नाही याबद्दल काही 'आतली' कारणं आहे. त्यातील पहिले कारण असे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी राज ठाकरेंना अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे. बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्रीवर ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या पार्थिवाच्या आसपास सुद्धा राज यांना जाऊ दिले नाही. तसंच बाळासाहेबांच्या पार्थिवा शेजारी फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते राहतील असं राजकारण खेळलं गेलं. बाळासाहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यापासूनही राज यांना बाजूला करण्यात आलं होतं अशी माहिती शिवसेनेचे जेष्ठ नेते दिवाकर रावते यांनी राज ठाकरे यांना दिली होती. आज दिवसभर घडलेल्या घटनेबाबत रावते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. शिवसेनेचा कोणताही नेता आज उपलब्ध होऊ शकला नाही. राज ठाकरे यांचं बाळासाहेबांवर प्रेम होतं आणि त्यांच्या मृत्यू समयी त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे ते दुखावले होते. दोन महिने त्यांनी संयम बाळगला पण आज उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या निमित्तामुळे हा वाद उफाळून आला. शिवसेना मनसे नजीकच्या भविष्यात एकत्र का येणार नाहीत ?

1. उद्धव आणि राज यांची दुखावलेली मनं अजून सांधलेली नाहीत2. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी राजना अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे.3. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवनी राज यांच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही.4. उद्धव यांच्या काही निकटवर्तीयांना हे दोन भाऊ एकत्र यावेत, असं वाटत नाही. यामध्ये संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होतो5. उद्धव आणि राज एकत्र आले तर राज वरचढ ठरतील, अशी भीती शिवसेना नेत्यांच्या मनात आहे6. राज यांच्या मनातही उद्धवविषयी विश्वास नाही. आपल्या आगामी दौर्‍यातली हवा काढण्यासाठी उद्धव आणि संजय राऊत हे राजकारण करत आहेत, असा संशय त्यांच्या मनात आहे7. मनसेचा विस्तार हा राज यांचा सध्याचा अजेंडा आहे, त्यामुळे या वर्षी तरी शिवसेनेशी युती करण्याचा ते विचार करणार नाहीत8. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना विस्कळीत झाली आहे. उद्धव यांच्या जवळच्या नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे. या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी उद्धव यांनी मनसेच्या युतीचं हे गाजर पुढे केलं आहे

close