संध्या सिंग यांची हत्या की आत्महत्या ?

January 31, 2013 4:44 PM0 commentsViews: 51

प्रशांत बाग, मुंबई

31 जानेवारी

नवी मुंबईतल्या संध्या सिंग यांच्या मृत्यूचं गूढ वाढतंच चाललंय. नेरुळच्या पाम बीचजवळ सापडलेल्या सांगाडयाचे अवशेष डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतरंच 13 डिसेंबरपासून बेपत्ता झालेल्या संध्या सिंग यांचाच हा सांगाडा आहे का हे निश्चित होणार आहे. दरम्यान, पोलीस, आपल्या तपासात हलगर्जी करत असल्याचा आरोप संध्या सिंग यांचे पती जयप्रकाश सिंग यांनी केला आहे.

नेरुळच्या याच एनआरआय कॉलनीत संध्या सिंग आपला मुलगा रघुवीर सोबत राहात होत्या.नेरुळ स्टेशनसमोरच्या या अभ्युदय बँकेत 13 डिसेंबरला संध्या सिंग यांना, त्यांची मैत्रीण ऊमा गौर यांनी सोडलं.पण त्यानंतर तब्बल 49 दिवस संध्या सिंग बेपत्ता होत्या.अखेर त्यांचा सांगाडा त्यांच्या घराजवळील खाडीच्या काठाशी सापडला.संध्या सिंग अभीनेत्री सुलक्षणा आणि विजयता पंडित यांची मोठी बहीण. बँकेत गेलेल्या संध्या सिंग या रिक्षातून उलवा गावात गेल्याचं तपासात उघड झालंय. पोलिसांच्या तपासावर संध्या सिंगचे पती जयप्रकाश सिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

पोलिसांनी मात्र संध्या सिंग यांच्या कुटुंबीयांचे आरोप फेटाळले आहे. हा तपास अत्यंत गुतागुंतीचा असून डीएनए च्या अहवालानंतर तपासाची दिशा ठरेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.

संध्या सिंग यांच्या मोबाईल लोकेशनवरून त्या करवा आणि उलवा या दोन विरुद्ध दिशेला असणार्‍या गावांत गेल्याचं निष्पन्न होतंय. पण हा प्रवास त्यांचा होता की त्यांच्या मोबाईलचा ? त्याच्याजवळील दागिन्यांचं काय झाल ? तो अज्ञात रिक्षावाला कोण ? त्यांची हत्या कोणी केली ? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधावी लागतील.

close