एका नक्षल जोडप्याची लग्नाची गोष्ट !

February 5, 2013 11:53 AM0 commentsViews: 22

05 फेब्रुवारी

ती आणि तो दोघेही नक्षलवादी…दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम..पण या प्रेमाला आडकाठी आली ती माओची. त्यांच्या प्रेमकथेला वरिष्ठांनी नकार दिल्यामुळे नक्षलवादी चळवळ सोडून पळून आलेल्या प्रेमी युगुलाला लग्नाच्या बेडीत बांधण्याचा यशस्वी प्रयोग गडचिरोली पोलिसांनी अहेरी या गावात घडवून आणला आहे.

गडचिरोली..नक्षलवाद आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीनं काळवंडलेला जिल्हा..पण या जिल्ह्यात शत्रुत्वाचे नाते झुगारून लग्नगाठ बांधण्याचं काम खाक्या वर्दीने केलंय. कोणत्याही सिनेमात घडवा असा सीन प्रत्यक्षात घडला आहे. आम्ही केवळ गोळ्या चालवत नाही तर हळूवार मनात आकार घेणार्‍या प्रेम भावनांचीही दखल घेतो हे पोलिसांनी नक्षलवाद्यांनी दाखवून दिले. एटापल्ली तालुक्यातील नैनगुडांच्या संतोष केड्डीकेल्ला हा नक्षलवादी चळवळीत काम करत असताना त्याची निर्मला उर्फ शांती कुडियामीशी ओळख झाली. चार वर्षापासून नक्षलवादी चळवळीत असणार्‍या निर्मला व संतोषच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. पण माओच्या विचारात व क्रांतीत प्रेमाला स्थान नाही. त्यामुळे या दोघांनी चळवळीतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. नक्षलवाद्यांची नजर चुकवता चुकवता या दोघांची चांगलीच दमछाक झाली. याचवेळी संतोषला पोलिसांनी अटक केली. व चौकशीच्यावेळी पोलिसांना संतोषची ही प्रेमकहाणी कळाली. गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरिक्षक रवींद्र कदम व पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ या दोघांना देऊन यांचे थाटामाटात लग्न लावून दिले. यासाठी लग्नाचा सगळा खर्च पोलिसांनी केला. तसेच लग्नासाठी संतोष व निर्मलाच्या नातेवाईकांना खास वाहने पाठवून आणण्यात आले.

close