नवे मुख्यमंत्री ,नवं राज

December 21, 2008 8:43 AM0 commentsViews: 5

21 डिसेंबर, नागपूर आशिष जाधव शपथविधी होत नाही तोच मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांना नागपूर अधिवेशनाला सामोरं जावं लागलं. पण प्रशासकीय कौशल्य आणि राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर चव्हाणांनी विरोधकांना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं. एवढंच नाही तर आपल्या काम एके काम वृत्तीनं चव्हाणांनी राज्य सरकार ही गतिमान केलं आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामुळं आलेल्या राजकीय त्सुनामीनंतर अशोक चव्हाणांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती. त्यात पुन्हा हिवाळी अधिवेशन. पण सभागृहात चव्हाणांच्या मुत्सद्देगिरीनं विरोधकही अवाक झाले. मुख्यमंत्री झाल्यापासून अशोक चव्हाणांच्या पर्सनॅलिटी आणि वर्किंग स्टाईलमध्ये कमालीचा बदल झालाय. एखाद्या 'मॅन ऑन मिशन' प्रमाणे ते काम करत आहेत. थोडक्यात, 26 नोव्हेंबरपासून थांबलेलं सरकार पुन्हा गतिमान झालं आहे. नागपुरात अशोक चव्हाणांच्या बिझी शेड्युलचा अनुभव त्यांच्या सहकार्‍यांनाही येत आहे. " सकाळी आठला प्रेस ब्रीफिंग होतं. नंतर पोलीस ब्रीफिंग. आणि त्यानंतर बैठका, कामकाज आणि शेवटचं ब्रीफिंग रात्री कधी एक वाजता तर कधी दोनला होतं" असं गृह राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांशी, अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून योग्य निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास असतो. "एखादी गोष्ट आपण का करू शकत नाही, याचं स्पष्टीकरण देण्याऐवजी ती कशी करू शकतो. हा त्यांचा दृष्टीकोन असतो. तो माझ्या मनाला फार भावतो" असं पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी सांगितलं. असं असलं तरी काँग्रेसमधील हेव्यादाव्यांवर मात करताना अशोक चव्हाणांची खरी कसोटी लागणार आहे. मात्र सध्या तरी त्यांनी आपल्याला सिद्ध केलं आहे आणि विरोधकांना बॅकफूटवर ढकललं आहे.

close