अपघातांचा ‘एक्स्प्रेस वे’चा पंचनामा

February 5, 2013 1:30 PM0 commentsViews: 39

05 फेब्रुवारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे… राज्यातलाच नव्हे तर देशातला पहिला एक्स्प्रेस वे..या एक्स्प्रेस वेमुळे मुंबई-पुणे अंतर आणि वेळ दोन्ही कमी झालं. साहजिकच वाहनांची संख्या वाढली, पण त्याचबरोबर वाढला वेग…आणि सुरु झाली अपघातांची मालिका..पण केवळ वेग हेच या अपघातांमागचं कारण नाही. तर देशभर कौतुक झालेल्या या एक्सप्रेस वेच्या काही त्रुटीही समोर आल्या आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला एक्स्प्रेस वे आता 'अपघात वे' बनला आहे. याचे पहिले कारण म्हणजे सिमेंट काँक्रिटचा रस्ता…सिमेंटमुळे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. हे तांत्रिक कारण असले तरी एक्स्प्रेस वेवर अनेक ठिकाणी तडे गेल्याचं निष्पन्न झालं आहे. थोडीफार डागडुगजी केली जाते पण वारंवार होणारा हा प्रकार अपघाताला कारणीभूत ठरला आहे. त्याचबरोबर एक्स्प्रेस वेवर दुचाकी वाहन चालकांनी प्रवेशबंदी आहे पण नियम मोडून अनेक दुचाकीस्वार वेवर घुसखोरी करतात. वेवर कोणीही प्रवेश करू नये यासाठी वेच्या बाजूने तारेचे कंपाउंड बांधण्यात आले मात्र काही ठिकाणी कंपाऊंड तोडण्यात आल्याचं समोरं आलं आहे. हायवेवर आडोशीच्या बोगद्यात प्रकाशाची योजना न केल्यामुळे वाहनचालकांना आपल्या वाहनाच्या प्रकाशात मार्ग काढावा लागतो. पण बोगद्यात वळण असल्यामुळे भरधाव वेगात बाहेर पडत असताना समोरील वाहनाचा अंदाज चुकतो. तिसरे कारण असे की, एक्स्प्रेस वेवर झालेले अपघात हे भरधाव वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून दुसर्‍या मार्गावरून येणार्‍या वाहनावर धडकल्याने अपघात घडले आहे. पण हे रोखण्यासाठी काही ठिकाणी तर दुभाजकच बांधलेले नाही. त्यामुळे प्रश्न असा उपस्थिती होतो की, मृत्यूचा सापळा बनलेल्या एक्स्प्रेस वेवर सुरक्षेच्या उपाय योजना का आखल्या गेल्या नाही ? वेळोवेळी एक्स्प्रेस वेचे सुरक्षा ऑडिट का केले नाही ? विकासाला हातभार लावणारे बहुउपयोगी प्रकल्प लोकांच्या जीवावर का बेतात याची कारणं शोधण्याची आणि लवकरात लवकर उपायोजना करण्याची गरज आहे.

close