नागपूरमध्ये गुंतवणुकीचा महाघोटाळा ?

February 5, 2013 2:41 PM0 commentsViews: 79

प्रवीण मुधोळकर, नागपूर

05 फेब्रुवारी

नागपूरमध्ये आणखी मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीला आला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजाचं आमिष दाखवून दोन कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि श्री सूर्या ग्रुप या त्या कंपन्या आहेत. त्यांना आरबीआय आणि सेबीकडून कुठलीही मान्यता नाही. त्यामुळे तिथं गुंतवणूक केलेल्या जवळपास 5 हजारांपेक्षा अधिक लोकांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत.

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि श्री सूर्या ग्रुप या कंपन्यांची सध्या नागपूरमध्ये मोठी चर्चा आहे. आणि त्याचं कारण आहे या कंन्यांकडून देण्यात येणारं अव्वाच्या सव्वा व्याज. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी लोकांना 48 महिन्यांत तिप्पट रक्कम देण्याचं प्रलोभन दाखवतेय. आणि त्यासाठी त्यांची मेंबरशीप फी आहे नॉनरिफंडेबल 2 लाख रुपये… ही कंपनी 10 टक्के पैेसे चेकनं, तर 90 टक्के रोख म्हणजे ब्लॅकनं घेते. तर श्री सूर्या ग्रुप या कंपनीत 21,000 देऊन मेंबरशीप घेता येते. या मेंबरशीपनंतर एक लाखावर प्रत्येक 3 महिन्यांनंतर साडे बारा टक्के व्याजदराने देण्याचे आश्वासन कंपनी देते. या व्यवहारात ठेवीदारांना एक प्रॉमिसरी नोट दिली जाते. ते परत करून आपले पैसे घेता येऊ शकतात, असा दावा कंपनी करते. यांसदर्भात आम्ही या दोन्ही कंपन्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय.

आमिषाला बळी पडून नागपूर आणि परिसरातल्या अनेकांनी या कंपन्यांमध्ये मोठ्या ठेवी जमा केल्यात. काही लोकांनी तर रिटायरमेंटचे पैसे, जमीन, घर विकून जास्त पैसे गुंतवले आहे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये जवळपास 4 हजार लोकांनी गुंतवणूक केली आहे. पण माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्या रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे नोंदणीकृत नाहीत.

यापूर्वी नागपुरात प्रमोद अग्रवाल यांनी महादेव डेव्हलपर्सच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. जयंत झामरे यांनीही 30 कोटींचा घोटाळा केला होता. मुळचा नागपूरचा असणारा स्टॉक गुरु उल्हास खैरेनेही देशभरातल्या 1 लाख ठेविदारांचे 1,100 कोटी बुडवले आहेत. राज्याची उपराजधानी अशा घोटाळेबाजांची राजधानी झाली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.

गुंतवणूक घोटाळावासनकर वेल्थ मॅनेजमेंट लि. – 48 महिन्यांत तिप्पट रकमेचं प्रलोभन – मेंबरशीप फी 2 लाख रु. (नॉनरिफंडेबल) – 10 % रक्कम चेकनं, 90 % रक्कम रोख म्हणजे ब्लॅकनं

श्री सूर्या ग्रुप – 21 हजार रु. मेंबरशीप फी- 1 लाखासाठी प्रत्येक 3 महिन्यांनंतर 12.5 % व्याजाचं आश्वासन – ठेवीदारांना एक प्रॉमिसरी नोट दिली जाते

यापूर्वीचे गुंतवणूक घोटाळे- प्रमोद अग्रवाल – महादेव डेव्हलपर्सच्या माध्यमातून 100 कोटींचा घोटाळा – जयंत झामरे – 30 कोटींचा घोटाळा – उल्हास खैरे – 1 लाख ठेवीदारांचे 1,100 कोटी बुडवले

close