शाही लग्न भास्कर जाधवांना पडले महागात !

February 19, 2013 2:34 PM0 commentsViews: 58

प्रशांत बाग, चिपळूण

19 फेब्रुवारी

एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे..तर दुसरीकडे शाही विवाहात हजारोच्या पंक्ती उठतायत.. ही विदारक स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रात… राज्यातल्या नेत्यांनीच आपल्या अमाप संपत्तीचं प्रदर्शन मांडलंय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा… पण यामुळे भास्कर जाधव चांगलेच गोत्यात आले आहे.

चिपळूणमध्ये झालेला भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा सध्या चांगलाच गाजतोय. या लग्नावर लाखो रुपयांचा खर्च शहा कन्स्ट्रक्शनने आपल्या प्रेमापोटी केल्याचं सांगत भास्कर जाधव यांनी आपला बचाव केला. पण यामुळे शहा कन्स्ट्रक्शनचा मालक मात्र अडचणीत सापडला आहे. सोमवारी इन्कम टॅक्सच्या पथकानं शहा कन्स्ट्रक्शनच्या मालकाच्या घरी आणि हॉटेलवर धाडी घातल्या. इतकंच काय तर इन्कम टॅक्स विभागाकडून भास्कर जाधव यांचीही चौकशी झाली. तर मंत्रीपदावर असताना केलेल्या भ्रष्टाचारातून लग्नसमारंभावर पैसे उधळल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भास्कर जाधवांसमोरच्या अडचणीत आणखीनच भर पडली. भास्कर जाधव यांच्या मुलांचं लग्नं ज्या मैदानावर झालं. त्या मैदानावरील आरक्षण उठवण्याचे प्रयत्नही जाधव यांनी केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचेच माजी आमदार रमेश कदम यांनी केला.

विवाहसोहळ्यावर लाखो रुपये उधळणार्‍या मंत्रीसाहेबांवर चिपळूणकरांनीही कडाडून टीका केली. भास्कर जाधव यांच्याकडून आता राजीनाम्याची मागणी होतेय. पण पक्षातून त्यांच्यावर काय कारवाई होतेय यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

close