काका-पुतण्यात मतभेद ?

February 19, 2013 3:38 PM0 commentsViews: 17

19 फेब्रुवारी

राजकारणात काका-पुतण्याचे मतभेद,वादविवाद हे राज्यात नवीन नाही पण आता याची झलक पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या घरात पाह्याला मिळाली आहे. शाही लग्नातील उधळपट्टीवरून शरद पवार यांनी भास्कर जाधव यांचे चांगलेच कान उपटले होते पण आज अजित पवार यांनी जाधव यांचे जोरदार समर्थन केले आहे. त्यामुळे काका-पुतण्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना लग्न समारंभावर उधळपट्टी केल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे चांगलेच कान उपटले होते. दुष्काळ नसताना खर्चही करतात आणि दुष्काळ असतानाही खर्च करतात याचे तरी तारतम्य ठेवले पाहिजे. मी माझ्या मुलीचे सुप्रीयाचे लग्न केले होते तेव्हा दोन लाख लोकं आली होती पण साधा मांडवही टाकला नव्हता. आज राज्यात दुष्काळ असताना माझ्याच पक्षाचे सहकारी भान न ठेवता अशा पद्धतीने लग्नावर उधळपट्टी करत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. याचा कधीच पुरस्कार केला जाणार नाही. जर सार्वजनिक जीवनात तुम्हाला तारतम्य बाळगात येत नसेल तर त्यांनी या क्षेत्रात राहू नये असा थेट सल्ला शरद पवार यांनी दिला होता. मात्र अजित पवार यांनी वेगळीच चूल मांडली आहे. पवार साहेबांनी आवाहन केलं आहे. पण तुम्ही एका जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आहात आणि पवार साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा हे ज्याच्या तेच्या हातात आहे. सार्वजनिक क्षेत्रात लोकं म्हणजे कोण ? आज अनेक लोकं धुमधडाक्यात लग्न करत आहे. पैसा खर्च करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशी विरोधी बाजूच अजित पवार यांनी मांडली आहे. तसंच दुष्काळ कुठे आहे ? पश्चिम महाराष्ट्रात चार जिल्ह्यात, मराठवाड्यात चार, पाच जिल्ह्यात,उत्तर महाराष्ट्रात तीन जिल्ह्यात, विदर्भात एका जिल्ह्यात आणि कोकणात, मुंबईत दुष्काळ नाही आहे. इथं पाण्याची फारशी समस्या नाही. त्यामुळे कोकणातील लोकं वेगळा विचार करतात असं सांगत अजितदादांनी जाधव यांचे समर्थन केले आहे. या अगोदरही अजित पवारांनी राजीनामा देऊन शरद पवारांना आव्हान दिलं होतं. राजकीय वर्तुळात काका विरुद्ध पुतण्या अशी चर्चाही रंगली होती. पण शरद पवारांनी मतभेद काहीही नाही असं स्पष्ट करत वादावर पडदा टाकला होता. पण आता पुन्हा एकदा अजित पवारांनी काकांच्या अधिकारांना एका प्रकारे जाहीर आव्हान दिलं आहे.

close