‘इंजिन’ धडकले ‘घड्याळा’वर !

February 27, 2013 3:40 PM0 commentsViews: 75

27 फेब्रुवारी

महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर विखारी टीका सुरू केली. याला अजित पवारांनी वेळोवेळी उत्तर दिलं. पण, या वाक्‌युद्धाचं रुपांतर आता राड्यात व्हायला सुरुवात झालीय. अहमदनगरमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमाराला मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि दगडफेक झाली. मंगळवारी रात्री झालेल्या या राड्याचे पडसाद आज दिवसभर राज्यभरात उमटले. कोकणापासून विदर्भापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलं. अहमदनगरजवळच्या भिंगार गावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. त्यांचा निषेध करण्यासाठी आणि काळे झेंडे दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच तयारी केली होती. राष्ट्रवादीची तयारी पाहून मनसेचे कार्यकर्तेही सज्ज झाले.आणि रात्री नऊच्या सुमाराला दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला. याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक केली. आणि मग काय दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि दगडफेकीनं वातावरण तापलं.हिंगोलीअहमदनगरमधल्या या राड्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा उभा संघर्ष पेटला. मंगळवारी रात्रीच हिंगोलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या घरांवर दगडफेक झाली. त्यात वाहनांचं नुकसान झालं.

नाशिकमनसेचे कार्यकर्ते बुधवारी आणखी आक्रमक झाले.संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मनसेचे आमदार वसंत गीते यांच्यासह 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.यवतमाळयवतमाळ जिल्ह्यातल्या वणीत मनसे कार्यकर्त्यांनी दोन बसची तोडफोड केली. पोलिसांनी मनसे जिल्हाप्रमुख राजीव उंबरकर यांच्यासह 6 जणांना ताब्यात घेतलं. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. रत्नागिरीत खेडजवळ मनसे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून मुंबई गोवा हायवे जाम केला.आणि अजित पवारांच्या पुतळ्याचं दहन केलं.

कोल्हापूर, सांगली, सातारा, वर्धा, बुलडाणा, धुळे, जळगाव, सोलापूर, नंदुरबार, बीड, याठिकाणीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. घोषणाबाजी आणि दगडफेक, केली.

दरम्यान, अहमदनगरमधल्या बिंगार पोलिसांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह 70 कार्यकर्त्यावर, तर मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close