खोलं खोलं विहिरीत पाण्यासाठी ‘तांडव’

March 2, 2013 12:06 PM0 commentsViews: 47

अलका धुपकर, औरंगाबाद

02 मार्च

मराठवाड्यातल्या गावागावांमध्ये खणलेल्या विहिरींमधून दुष्काळाचं विदारक चित्र दिसतंय. घोटभर पाण्याची आस लागलेले शेतकरी जिथे जागा मिळेल तिथे विहिरी खणू लागले आहेत. दुष्काळाग्रस्त भागात अगदी शेजारी शेजारी आणि खोलवर खोदल्या जाणार्‍या विहिरींमुळे जमिनींची अक्षरश: चाळण होतेय.

औरंगाबादमधल्या खुलताबाद तालुकातल्या गदाना इथं पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत हेच चित्र दिसतं. पाण्यासाठी गावकर्‍यांना दाहीदिशा फिरावं लागतं. दुष्काळाने मराठवाड्यातल्या लोकांची पार दैना केली आहे. पावसाने पाठ फिरवली. जनावरांना चारा नाही. सरकार पिण्याच्या पाण्याचा टँकर कधी देईल याची काहीच खात्री नाही. म्हणूनच आपल्या जनावारांना जगवण्यासाठी, त्यांना चारा मिळवून देण्यासाठी हे गावकरी विहिरी खोदू लागलेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहेत.

500 मीटरच्या परिसरात दुसरी विहीर बांधू नये, असा नियम आहे. पण, एकट्या गदानात सध्या 18 हून जास्त नव्या विहीरींचे खोदकाम सुरु आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावात अशा शेकडो विहीरींचं खोदकाम सुरु आहे. नवनव्या विहिरी खोदणं हा भीषण दुष्काळासोबतच सुरु झालेला नवा व्यवसाय आहे. पाण्याच्या आशेने कासावीस झालेल्या शेतकर्‍यांना कायदा आणि जलसाक्षरतेची समज कोण देणार हा मोठा प्रश्न आहे.

close