महिलांच्या सुरक्षेबाबत रक्षकाचेच एक पाऊल मागे !

March 7, 2013 5:01 PM0 commentsViews: 50

07 मार्च

उद्या जागतिक महिला दिन… पण महाराष्ट्रात आणि देशातही महिलांची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचंच चित्र आहे. महाराष्ट्रातल्या भंडार्‍यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार होऊन 20 दिवस उलटले. पण आरोपी अजूनही मोकाट आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. भारतीय स्रिया पोलिसांवर विश्वास ठेवू शकतात का ? खाकी वर्दीतल्या पोलिसांकडून सुरक्षा, न्याय आणि संवदेनशीलतेने मदतीची अपेक्षा महिला बाळगू शकतात का ? या सर्व प्रश्नासंबंधी आयबीएन नेटवर्कने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक माहिती मिळाली आहे. छुप्या कॅमेर्‍यांने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये महिलांवरील अत्याचाराविषयी तक्रार नोंदवून घेताना पोलीस खात्यातील लोकांची सरंजामशाही वृत्ती दिसून आली आहे. तसंच तक्रारदार महिलांनाच पोलीस कशा प्रकारे अशा घटनांना जबाबदार आहेत हेही दिसून आलंय. दुर्देवाने महिलांना न्याय मिळवून देण्यात पोलिसच मोठा अडथळा ठरत असल्याचं या स्टिंग ऑपरेशन आढळून आलं आहे.

हट्टी, असंवेदनशील आणि परिस्थितीची जाणच नाही, अशी अवस्था आहे आपल्या पोलिसांची… आयबीएन नेटवर्कच्या पत्रकारांनी संशोधक म्हणून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानातल्या 25 पोलीस स्टेशनमधील जवळपास 50 पोलिसांची भेट घेतली. त्यातून आढळला तो महिलांविषयींचा कर्मठ दृष्टीकोनच. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज कायदेतज्ज्ञ बोलून दाखवतात, तर महिलांच्या संमतीशिवाय बलात्कार होऊ शकत नाही असं धक्कादायक मत मांडलय याच कायद्याचं रक्षण करणार्‍या पोलिसांनी..

अलवार, भिवानी, मेरठ, रोहतक, बुंलदशहर, दौसा असो किंवा मग पानिपत, शहर वेगळं असो वा राज्य मानसिकता मात्र एकसारखीच. महिलांवर होणारे अत्याचार वाढत असताना आणि पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर चौफेर टीका होत असताना देखील वर्दीतील काही माणसांची मानसिकता अजूनही सरंजमाशाहीचीच आहे. त्यांच्यामते महिलाच अशा सर्व प्रकारांना सर्वस्वी जबाबदार आहेत.

काही पोलिसांना अशा प्रकरणांमध्ये पीडित महिला नव्हे तर अत्याचार करणारे पुरुषच अन्यायाचे बळी ठरतात असं वाटतं. कायद्यात होणारा बदल हा पुरुषांना त्रास देण्यासाठीच आहे असंच त्यांनी वाटतं. नैतिकतेच्या गोष्टी सोडा पण कायद्याचं असणारं अज्ञानही चक्रावून टाकणारे आहे.

पोलिसांचा संमतीचा दावा हा केवळ महिला अत्याचाराविषयी मर्यादित नाही तर अपहरणाच्या प्रकारातही मुलींची संमती असते आणि त्या स्वताहूनच मुलांसोबत पळून जातात अस धक्कादायक निष्कर्षही पोलिसांनी काढलाय. ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची, महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी तेच जेव्हा महिलांकडे संशयाच्या नजरेने बघतात तेव्हा महिलांनी मदतीसाठी कोणाकडे पाहायचा हा प्रश्न अनुत्तरितच राहतो..

close