कर्तुत्ववान ‘मुक्तां’सोबतचा सन्मान खूप मोलाचा -गौरी शिंदे

March 8, 2013 1:17 PM0 commentsViews: 103

08 मार्च

महिलांच्या कर्तृत्वाचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी आयबीएन-लोकमतने मुक्ता सन्मान पुरस्कार सुरु केले आहेत. हा सन्मान सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 व्यक्तिमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी इंग्लिश-विंग्लिश सिनेमाच्या दिग्दर्शक गौरी शिंदे यांना मुक्ता सन्मान देऊन गौरवण्यात आलं. मुक्ता सन्मानच्या निमित्ताने तळागाळातील महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. त्यांच्यासोबत मला हा सन्मान देण्यात हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे अशी भावना गौरी शिंदे यांनी व्यक्त केली.

इंग्लिश विंग्लिश सिनेमा रिलीज झाला.. आणि गौरी शिंदेची ओळख सगळ्या जगाला झाली. या सिनेमातून श्रीदेवीचा फक्त कमबॅक नव्हता, तर महत्त्वाचं म्हणजे गौरी शिंदेच्या वेगळ्या विचारांची, वेगळ्या दिग्दर्शनाची चुणूक सगळ्यांना पाहायला मिळाली. या सिनेमाने कित्येक गृहिणींना आत्मविश्वास दिला. गृहिणीच्या कामाचं मोल ओळखायला कित्येकांना भाग पाडलं. स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनालाच गौरीने छेद दिला. तोही या कमर्शिअल सिनेमातून. इंग्लिश विंग्लिश हा तिचा पहिला सिनेमा असला तरी 100पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स आणि जाहिराती तिनं बनवल्यात. तिची 'ओ मॅन' ही शॉर्ट फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी निवडली गेली. प्रख्यात दिग्दर्शक आर. बाल्की हे तिचे पती. पण गौरी शिंदेनं बॉलिवूडमध्ये आपल्या दिग्दर्शनाचा स्वतंत्र असा वेगळा ठसा उमटवलाय. गौरीच्या बॉलिवूडमधील दमदार सलामीला आयबीएन-लोकमतचा सलाम.

close