कृपाशंकर 12 वी नापास ; आमदारकी धोक्यात ?

February 27, 2012 5:49 PM0 commentsViews: 10

सुधाकर काश्यप, मुंबई

27 फेब्रुवारी

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकले आहे. पण आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण आमच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिक्षणाबद्दल खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते.

कृपाशंकर सिंह.. एकेकाळी मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा गेल्या आठवड्यात ते बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकले. पण आता आमच्या हाती लागलेल्या माहितीमुळे कृपाशंकर सिंह यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकते. विधानसभेसाठी अर्ज भरताना त्यांनी आपलं शिक्षण बीएससी लिहिलं होतं. आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार..मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे प्रत्यक्षात बारावी नापास आहेत!

मार्कांची अव'कृपा'!- 1999 साली छापलेल्या शासकीय आमदार परिचय पुस्तकात कृपाशंकर बीएसएसी (BSc) असल्याचं छापलं आहे- तर 2004 आणि 2009 साली उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात इंटर पास झाल्याचं लिहिलं आहे

या एका कागदा मुळेच कृपा शंकर सिंह यांचा खोटारडेपणा उघड होत आहे. जौनपूर येथील ज्या कॉलेजमध्ये कृपा शंकर यांनी शिक्षण घेतलं त्या कॉलेजच्या प्रार्चायच हे पत्र आहे. यात कृपा शंकर सिंह हे बारावी नापास असल्याचं म्हटलं आहे.

कृपाशंकर सिंग यांची माहिती संजय तिवारी आणि गणेश तिवारी यांनी गोळा केली. त्यांनी माहितीच्या अधिकार वापरून ही कागदपत्रं मिळवली आहे. यात स्पष्टपणे नमूद केलंय की कृपाशंकर रामनिरंजन सिंह यांना 1966 साली दहावीच्या परीक्षेत तृतीय श्रेणी मिळाली. तर ते 1971 साली बारावीत नापास झाले. बारावीत नापास झालेल्या कृपाशंकर यांनी गेली अनेक वर्षं निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली, हे स्पष्ट होतं आहे.

close