शिवसेनेचा विरोध धुडकावत,काकोडकरांचा परिसंवादात सहभाग

February 28, 2012 9:44 AM0 commentsViews:

28 फेब्रुवारी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर बोलू नका, या शिवसेनेनं दिलेल्या इशार्‍याला न जुमानता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शिवसेनेच्या दडपशाहीला उत्तर दिलंय. जैतापूर प्रकल्प सुरक्षित असून प्रकल्पाबद्दल अवास्तव भीती निर्माण केली जातेय, असं वक्तव्य करून शिवसेनेची दडपशाही त्यांनी झुगारून दिली.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या व्याख्यानाला शिवसेनेनं आव्हान दिलं होतं. काकोडकरांचे व्याख्यान आज राजापुरात होणार होतं. पण आज पुण्यात विज्ञान दिनाच्या निमित्ताने याच विषयावर कडक पोलीस बंदोबस्तात ऊर्जा आणि विकास विषयावर परिसंवाद झाला. त्यात काकोडकरांनी जैतापूरच्या विषयावर आपली सडेतोड मतं मांडली.

कोकणातील शिवसेनेच्या दडपशाहीला घाबरून रद्द करण्यात आलेला कार्यक्रम पुण्यात घेऊन दाखवून संयोजकांनी धाडस दाखवलं. तर काकोडकररांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेला उत्तर दिलं.

अणुऊर्जा प्रकल्पाविषयी मतमतांतरं असू शकतात, पण त्याविषयी चर्चाच न करता या विषयावर बोलायचंच नाही, अशी दडपशाहीची भूमिका शिवसेनेनं घेतली होती, पण संयोजकांनी आणि स्वत: काकोडकरांनी या धमकीला भीक न घालता दडपशाहीपेक्षा चर्चा करा असाच संदेश दिला.

close