बीडपाठोपाठ सांगलीत आढळली अफूची शेती

February 28, 2012 6:13 PM0 commentsViews: 92

28 फेब्रुवारी

अफूची बेकायदेशीर शेती करणार्‍यांवर सध्या राज्यभर पोलिसांचे धाडसत्र सुरुच आहे. आज सांगली जिल्ह्यात पोलिसांनी धाड टाकून नऊ एकरावरील अफूची बोंडं जप्त केली आहे. त्याची किंमत तब्बल 50 लाख रुपये आहे. याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातच आता शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेनं अफूच्या शेतीला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

हा अफगाणिस्तान नाही! अफूचं हे शेत आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातलं. बीडपाठोपाठ सांगलीतही पोलिसांनी इथं धाड टाकलीय. नाटोली चिखलीच्या परिसरात 9 एकर जमीनीवर ही शेती होतेय.

अफूची शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्यावर कारवाई करुन पोलिसांना अफूच्या शेतीला आळा घालण्याचा प्रयत्न केलाय. पण यामागे असणारं रॅकेट कोण शोधणार किंवा कोण पकडणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

अफूची लागवड करणं कायद्यानं गुन्हा आहे. अफूची लागवड करायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागावी लागते. काही अटींसह परवानगी मिळू शकते. भारतात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यातील ठरावीक पट्‌ट्यातच अफूचं पीक घेण्यास परवानगी आहे. मुळात ही परवानगी औषधी उपयोगासाठीच दिली जाते. महाराष्ट्रात मात्र अफूच्या लागवडीवर सरसकट बंदी आहे.इतर राज्यांत परवानगी मिळते, तर महाराष्ट्राल्या शेतक-यांनाही मिळावी, अशी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेनं केली आहे.

अफूच्या झाडापासून नशेचे पदार्थ, औषधं, तसेच खसखस बनवली जाते. या पदार्थांची मोठी मागणी पाहता, परप्रांतीय एजंटामार्फत अफू 3,500 ते 4,000 रुपये किलोने विकत घेतली जाते. म्हणून अफूची शेती वेगानं फोफावत आहे.

close