‘पाकिस्तानने मर्यादेत राहावे’

March 15, 2013 10:17 AM0 commentsViews: 13

15 मार्च

दिल्ली : अफझल गुरूच्या फाशीला विरोध करण्याचा ठराव गुरूवारी पाकिस्तानच्या संसदेनं मंजूर केला. पाकिस्तानच्या या आगाऊपणाला भारतानं आज प्रत्युत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीरसह, संपूर्ण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानी संसदेनं मंजूर केलेला ठराव फेटाळत असल्याचा ठराव लोकसभेनं एकमतानं मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडींमुळे दोन्ही देशांचे चांगलेच बिघडलेत.

संसदेवर हल्ल्यातला दोषी अफझल गुरूला फाशी दिल्याविरोधात, गुरुवारी नॅशनल असेंब्लीमध्ये ठराव मांडून पाकिस्ताननं भारताची नव्याने कुरापत काढली. अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पाकिस्तानी राजकारणांच्या या नस्त्या उठाठेवीमुळे भारतात संतापाची लाट उसळली. प्रत्येक छोट्या मोठ्या मुद्द्यांवरून एकमेकांविरोधात भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांनी एकमुखाने पाकिस्तानला समज दिली.

पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानात परतण्याची केलेली घोषणा, दहशतवादाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली कोंडी, सरकारविरोधात सक्रिय असलेले सर्वोच्च न्यायालय, पुन्हा सत्ता ताब्यात घेण्यास आतूर असलेले पाकिस्तानी सैन्य आणि वाढता धार्मिक उन्माद अशा परिस्थितीत पाकिस्तानी राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा तिथल्या नागरिकांना भुलवणारा काश्मीरचा मुद्दा उकरून काढलाय. त्याचा त्रास भारतालाच होणार आहे. या ठरावात काय म्हटलंय ?

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने 14 मार्च 2013 रोजी जो ठराव मंजूर केला त्याचा आम्ही ठाम विरोध करतो. भारतात अतिरेकी कायवाया करण्यासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही, असं आश्वासन पाकिस्ताननं दिलंय. या आश्वासनाची पूर्तता हाच पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठीचा पाया आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सभागृहाला मान्य नाही. त्यामुळेच भारत पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी कट्टरतावादी आणि अतिरेकी तत्त्वांना पाठिंबा मिळेल, अशा कृत्यांपासून दूर रहावं. बेकायदेशीरपणे पाकिस्तान बळकावलेल्या भागासाह संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील याचा हे सभागृह पुनरुच्चार करतं. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ भारत सहन करणार नाही. त्याला संपूर्ण देश एक होऊन आणि खंबीरपणे उत्तर देईल.

close