विलासराव अखेर नागपुरात दाखल

December 22, 2008 5:54 AM0 commentsViews: 5

22 डिसेंबर, नागपूरराजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख विधीमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित रहात आहेत. रविवारी रात्रीच ते नागपुरात दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षात प्रथमच विधानसभेत ते एका साध्या आमदाराच्या खुर्चीवर बसणार आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या संपूर्ण पहिल्या आठवड्यात विलासराव देशमुख गैरहजर राहिले होते. त्यामुळे सर्व थरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.विधीमंडळाच्या पहिल्या आठवड्यात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच आठवड्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर विधीमंडळात जोरदार चर्चा झाली. विलासराव मुख्यमंत्री असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, मात्र त्यावरील चर्चेत विलासराव देशमुखांची उपस्थिती हा चर्चेचा मुद्दा ठरला होता. नारायण राणेंनी तर विलासरावांना शोधा आणि राणेंकडून बक्षीस घेऊन जा, अशी घोषणा केली होती. विरोधकांबरोबरच जनतेतही विलासरावांविषयी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विलासराव काय बोलणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close