बेळगावातले मराठी भाषिक अस्वस्थ

December 23, 2008 3:44 PM0 commentsViews: 2

23 डिसेंबर बेळगावकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुनर्रचेनवरून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये वाद निर्माण झाला होता. पण आता थेट एकीकरण समितीमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे मराठी भाषिक अस्वस्थ झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर जेष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील हे एकीकरण समितीची मोट बांधत असताना, दुसरीकडे किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सीमा लढ्यासाठी समितीची वेगळी चूल मांडण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीनं हार पत्करल्यानंतरही एकी दिसत नाही. ज्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यांनी खुशाल जावं. आणि ज्यांना सीमाभागासाठी लढायचं आहे, त्यांनी समितीमधून लढत राहावं असं आवाहन जेष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी केलं आहे.सीमाभागासाठी लढणा-या कार्यकर्त्याच्या दुफळीमळे मराठी भाषिक मात्र अस्वस्थ झालेला दिसतोय. येत्या 16 जानेवारीला कर्नाटक विभानसभेचं अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे. पण एकीकरण समितीमध्ये पडलेल्या फुटीमळे अधिवेशनाला होणा-या विरोधकांची ताकद कमी पडणार हे मात्र निश्चित.

close