शिल्पकार मंत्रवादींना न्याय मिळेल का?

December 24, 2008 10:39 AM0 commentsViews: 69

24 डिसेंबर सिंधुदुर्गविख्यात शिल्पकार आणि चित्रकार श्रीकांत मंत्रवादी यांच्यावर सध्या सिंधुदुर्गातल्या आचरा गावात कोंबडीपालनाचा व्यवसाय करून गुजराण करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातल्या जालना नगरपरिषदेत भ्रष्टाचारात साथ दिली नाही म्हणून त्यांना हे दिवस पहावे लागत आहेत. नुकसान भरपाईसाठी गेली 19 वर्ष ते सरकारदरबारी दाद मागत आहेत. विख्यात शिल्पकार श्रीकांत मंत्रवादी यांना 1988 साली जालना नगरपरिषदेने महनीय व्यक्तींचे अर्धपुतळे तयार करण्याचं काम दिलं. पण त्यांच्याकडे तत्कालीन नगरसेवकांकडून लाच मागितली गेली. ती त्यांनी नाकारली.मंत्रवादी सांगतात, त्या वेळेचे नगरसेवक अमानउल्ला आणि त्यांचे 2 सहकारी यांनी माझ्याकडे 1लाख रुपयांची मागणी केली. दुदैर्वाने मी मागणी पूर्ण करू शकलो नाही. कारण पैसे कमी होते. पण त्या नगरसेवकांनी मंत्र्यवादींना खूनाची धमकी दिली. म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेट केली. आणि यानंतरच्या राजकारणामुळे त्यांचं काम 1989 ला रद्द करण्यात आलं. याबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी अनेक मंत्र्यांच्या घराच्या पाय-या झिजवल्या, पण सर्व व्यर्थ गेले. मंत्रवादींनी लोकायुक्तांकडेही दाद मागून बघितली पण त्याचा उपयोग झाला नाही. आता न्यायालयात धाव घ्यायला त्यांच्याजवळ पैसेच उरलेले नाहीत.शासनाने मला माझी बाजू योग्य की अयोग्य आहे हे तरी सांगावं. किंवा काहीतरी निकाल द्यावा असं त्याचं म्हणणं आहे. मंत्रवादी सध्या सिंधुदुर्गातल्या आचरा या आपल्या गावी भाड्याच्या घरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करतात. गेले 19 वर्ष ते निकालाविना राहिले आहेत. आता मुख्यमंत्री पदाबरोबरच राज्याचं सांस्कृतिक खातही सांभाळणारे अशोक चव्हाण याकडे लक्ष देतील का ? आता तरी शिल्पकार मंत्रवादींना न्याय मिळेल का?

close