क्षितिज ठाकूरांसह 15 आमदारांवर गुन्हा दाखल

March 19, 2013 4:33 PM0 commentsViews: 88

19 मार्च

एपीआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी अखेर नालासोपार्‍याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह 15 आमदारांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मारहाण करणं, धमकावणं, जीवे मारण्याची धमकी देणे, दंगल, गोंधळ, सरकारी नोकराला अडथळा निर्माण करणं हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.आज विधानभवनात आमदारांनी वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. नालासोपार्‍याचे आमदार बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम आणि सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केलीय. सचिन सूर्यवंशी यांचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी सोमवारी सी लिंकवर भांडण झालं होतं. एका एपीआय सोबत झालेल्या भांडणामुळे ठाकूर दुखावले गेले होते. त्यांनी थेट विधानसभेत सूर्यवंशीविरोधात तक्रार दाखल केली आणि सूर्यवंशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. एवढे होऊन सुद्धा क्षितीज ठाकूर यांनी आज विधानसभेत त्याच्या विरूद्ध हक्कभंगचा प्रस्ताव सादर केला. यावेळी सूर्यवंशी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. सूर्यवंशी यांनी गॅलरीतून आमदारांना शिविगाळ केली. यानंतर ठाकूर यांच्यासह राम कदम, औरंगाबादचे सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल,ााजपचे आमदार जयकुमार रावल यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन सूर्यवंशींना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण देत बाहेर काढले. या मारहाणीत सूर्यवंशी बेशुद्ध पडले होते. त्यांना स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला हलवण्यात आलंय.

दरम्यान संध्याकाळी आम्ही एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली नाही. आम्ही सगळे आमदार सूर्यवंशींना समजवण्यासाठी गेलो असताना त्यांनीच राम कदम यांना धक्का दिला आणि ते खाली पडले यांनंतर झालेल्या झटापटीत ते खाली पडले आणि मार लागला. पण सूर्यवंशी विधानभवनात उद्धटपणे वागले, यात त्यांचीच चूक आहे. त्यांचे समर्थन केले जाणार या सर्व प्रकरणात मी स्वत: जबाबदारी घेतो त्यात बाकीच्या आमदारांची चुकी नाही असा खुलासा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. तसंच या प्रकरणी माफी मागणार नाही आणि दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईल असंही ठाकूर यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. उद्या कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

close