PSI सचिन सूर्यवंशी निलंबित

March 25, 2013 11:21 AM0 commentsViews: 57

25 मार्च

मुंबई : आमदारांच्या एकजुटीचं उदाहरण आज आणखी एकदा पाहाण्यास मिळालं. आमदारांच्या मागणीमुळे अखेर पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित केल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत केली. सूर्यवंशी यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय. सूर्यवंशींची भाषा अरेरावीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारची भाषा पोलीस अधिकार्‍याला न शोभणारी असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटल आहे. सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली. ही समिती चौकशी करून अहवाल सरकारला देणार आहे.

आज विधाससभेत मनसे आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकुर या निलंबित आमदारांना अटक करण्यासाठी विधान भवनात आलेल्या विनापासधारक पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली होती. तसंच अटक न झालेल्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं असाही आग्रह सेनाभाजपच्या नेत्यांनी सरकारकडे धरला आहे. मारहाण आणि अटकेच्या प्रकरणावर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सभागृहात निवेदन करावं अशीही मागणी केली होती. या गोंधळावरुन विधानसभा पहिल्यांदा एक तासासाठी आणि दुसर्‍यांदा दोन तासासाठी तहकूब करण्यात आले होते.

दरम्यान, विरारचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांना जामीन मंजूर झालाय. दोन्ही आमदारांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. सेशन्स कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये त्यांना जामीनदार द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर दर बुधवारी या ठाकूर आणि कदम या दोघांनाही सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपास अधिकार्‍यांकडे हजेरी लावावी लागणार आहे.

close